नवी दिल्ली – देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा संसर्ग वेगाने वाढत आहे. दिल्लीत रविवारी ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला. महाराष्ट्रात सात आणि राजस्थानात नऊ जणांना संसर्ग झाल्याचा दुजोरा मिळाला आहे. अशा प्रकारे आतापर्यंत २१ जण ओमिक्रॉनच्या कवेत आले आहेत. यापूर्वी कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले होते. एकूणच एका दिवसात ओमिक्रॉनचे १७ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशात दहशतीचे वातावरण आहे. या रुग्णांपैकी कोणीही गंभीर नाही, ही त्यातील दिलासादायक बाब आहे.
१७ रुग्णांचा अहवाल जिनोम सिक्वेंलसिंगसाठी
आतापर्यंत १७ जण पॉझिटिव्ह आढळले असून, त्यांना लोकनायक जयप्रकाश (एलएनजेपी) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्व रुग्णांचा अहवाल जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठविण्यात आला होता. १२ जणांचा अहवाल आला असून टांझानिया येथून आलेल्या युवकाला ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याला दुजोरा मिळाला आहे. हा प्राथमिक अहवाल आहे. प्रयोगशाळेतून अंतिम अहवाल सोमवारी मिळणार आहे. सध्या एकूण २३ जणांना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये १७ कोविड पॉझिटिव्ह आणि ६ जण त्यांच्या संपर्कात आलेले आहेत. ज्या युवकाला ओमिक्रॉनची लागण झाल्याची पुष्टी मिळाली आहे त्याच्या संपर्कातील ४ जणांनाही एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात सात जणांना लागण
राज्यात पुणे जिल्ह्यातील सात जणांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. बाधितांमध्ये नायजेरियातून आलेली महिला आणि तिच्या दोन मुलींचा समावेश आहे. त्या पिंपरी चिंचवड परिसरात आपल्या भावाला भेटण्यासाठी आल्या आहेत. महिलेचा भाऊ आणि त्यांच्या दोन मुली सुद्धा बाधित झाल्या आहेत. गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात फिनलँडहून पुण्याला परतलेल्या एका व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण झाली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण आठ जणांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. यापूर्वी डोंबिवलीतील एक जण ओमिक्रॉनबाधित आढळला होता.
दिल्लीत एक जण बाधित
राजधानी दिल्लीत ओमिक्रॉनचा संसर्ग झालेला ३७ वर्षीय युवक काही दिवसांपूर्वी टांझानियाहून आला होता. जिनोम सिक्वेंसिंगच्या अहवालात ओमिक्रॉनची लागण झाल्याची पुष्टी झाल्यानंतर त्याच्यावर एलएनजेपीमध्ये विशेष कक्षात उपचार सुरू आहेत. आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन म्हणाले, की परदेशातून येणार्या प्रवाशांची चाचणी करण्यात येत आहे.
राजस्थानात ९ बाधित
राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये नऊ जणांना ओमिक्रॉनची बाधा झाली आहे. ४ जण दक्षिण अफ्रिकेतून परतले होते आणि पाच जण त्यांच्या संपर्कात आलेले नातेवाईक आहेत. दक्षिण अफ्रिकेतून आलेल्या चार सदस्यांना यापूर्वीच आरयूएचएस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या पाच इतरांनाही आरयूएचएसमध्ये दाखल करण्यात आले आहे. दक्षिण अफ्रिकेतून आलेल्या कुटुंबासह त्यांच्या संपर्कात आलेल्या ३४ नागरिकांचे नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी नऊ जणांना ओमिक्रॉनची बाधा झाल्याची पुष्टी झाली आहे. तर २५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
यामुळे वेगाने फैलावतोय ओमिक्रॉन
ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांना सौम्य लक्षणे किंवा लक्षणे नसल्याचे आढळले आहे. त्यामुळेच तो वेगाने फैलावत आहे. ७० ते ८० टक्के नागरिकांमध्ये लक्षणे दिसली नाहीत. तर काहींना सामान्य सर्दी-खोकला असल्याचे दिसत आहे. रुग्णांमध्ये गंध, चव गेल्याचा किंवा ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याचा त्रासही जाणवत नाहीय.








