नवी दिल्ली – देशात सध्या दररोज सरासरी सात ते आठ हजारांच्या आसपास कोरोनाचे नवे रुग्ण आढळत आहेत. परंतु ही परिस्थिती बरेच दिवसांपर्यंत कायम राहण्याची शक्यता नाहीये. कोरोनाचा नवा अवतार ओमिक्रॉन वेगाने फैलावत आहे. जेव्हा तो आतापर्यंत सर्वात जास्त संक्रामक मानल्या गेलेल्या डेल्टा व्हेरिएंटला मागे टाकेल, तेव्हा देश महामारीच्या तिसर्या लाटेशी सामना करेल. नॅशनल कोविड-१९ सुपरमॉडेल समितीच्या सदस्यांनी ओमिक्रॉनबद्दल सतर्क केले असून, फेब्रुवारीपर्यंत तिसरी लाट उच्च पातळीवर पोहोचण्याची शंका या सदस्यांनी व्यक्त केली आहे.
दुसऱ्या लाटेचा अचूक अंदाज
देशात कोरोना संसर्गाच्या बदलत्या स्थितीवर नजर ठेवण्यासाठी तसेच परिस्थितीचे आकलन करण्यासाठी गेल्यावर्षी सरकारने एक समिती स्थापन केली होती. आपल्या सांख्यिकी मॉडेलच्या आधारावर या समितीने दुसर्या लाटेबद्दल अचूक भाकित वर्तवले होते.
भयानकता कमी
या समितीचे प्रमुख आणि हैदराबाद येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेमधील प्राध्यापक विद्यासागर म्हणाले, की भारतात ओमिक्रॉनमुळे तिसरी लाट येणार आहे. परंतु दुसर्या लाटेच्या तुलनेत तिसरी लाट भयानक नसेल.
डेल्टाला मागे टाकणार
एएनआयशी बोलताना विद्यासागर म्हणाले, देशात पुढील वर्षीच्या सुरुवातीला तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. देशात व्यापक प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती असल्यामुळे दुसर्या लाटेच्या तुलनेत ही लाट सौम्य असेल. आता दररोज ७५०० रुग्ण आढळत आहेत. परंतु ओमिक्रॉन जेव्हा डेल्टाला मागे टाकून प्रमुख संक्रामक व्हेरिएंट होईल, तेव्हा निश्चितच ओमिक्रॉन रुग्णांची संख्या वेगाने वाढणार आहे.
कोरोना अँटिबॉडी
ते म्हणाले, की दररोज जास्त रुग्ण आढळणार नाहीत. ज्यांनी लस घेतली नाही अशा बहुतांश नागरिकांना डेल्टा व्हेरिएंटची बाधा झाली होती. आता ८५ टक्क्यांहून अधिक वयस्कांनी कोरोनाचा पहिला डोस आणि ५५ टक्क्यांहून अधिक नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. देशात ७५ ते ८० टक्के नागरिकांमध्ये कोरोना अँटिबॉडी आढळल्या आहेत. त्यामुळे तिसर्या लाटेत दररोज जास्त रुग्ण आढळणार नाही.
दररोज एक ते दोन लाख रुग्ण
समितीचे सदस्य आणि दुसर्या लाटेचा अचूक अंदाज लावणारे प्रा. मणिंद्र अग्रवाल म्हणाले, की तिसर्या लाटेदरम्यान भारतात दररोज एक ते दोन लाख नवे रुग्ण आढळण्याची शक्यता आहे. दुसर्या लाटेच्या तुलनेत ते निम्म्याहून कमी असतील. दुसर्या लाटेदरम्यान ही संख्या मे महिन्यात पहिल्या आठवड्यात दररोज चार लाखांच्यावर गेली होती.
सामुहिक संसर्ग सुरू
समितीच्या माहितीनुसार ओमिक्रॉनचा सामुहिक संसर्ग सुरू झाला आहे. विद्यासागर म्हणाले की कोरोनापासून बचावासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. कारण उपचाराऐवजी प्रादुर्भाव रोखणे महत्त्वाचे आहे