नितीन नायगावकर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
सर्वसाधारणपणे लग्नाआधी मुलगी गरोदर असेल तर तिने कुटुंबाचं नाक कापलं, तोंड काळं केलं, प्रतिष्ठा घालवली, वगैरे वगैरे अश्याप्रकारचे डायलॉग्स आपण ऐकत आलोय. पण मुल झालं तरच लग्न लावून दिलं जाईल, असं कुणी म्हणत असेल तर ते खरं वाटणार नाही. पण हे वास्तव आहे. भारतात एका ठिकाणी लग्नाची हीच प्रथा आहे.
असं म्हणतात की भारतात दर २५ मैलावर भाषा आणि संस्कृती बदलते. प्रत्येक संस्कृतीला एक परंपरा असते. या परंपरेत अनेक प्रथा असतात. कुठे बाळाच्या जन्माच्या वेळी वेगळीच प्रथा असते, तर कुठे लग्नाची वेगळी प्रथा असते. जेवढा मोठा देश तेवढ्या प्रथा, असे चित्र आहे. भारतात लग्नाच्या प्रथा बघायला आपण गेलो तर काही ठिकाणी अत्यंत वेगळं चित्र आपल्याला बघायला मिळतं. राजस्थान, मेघालय, गुजरात, दक्षिण भारत, हिमाचल प्रदेश येथील काही प्रथांची तर चर्चाच व्हायला हवी.
गुजरात, राजस्थानमध्ये गरसिया जमातीचे लोक राहतात. गुजराती, मारवाडी, मेवाडी आणि भिली या त्यांच्या मातृभाषा. या जमातींमध्ये लग्नाची प्रथा पूर्णपणे निराळी आहे. इथे मुलगा आणि मुलगी यांना पहिले बाळ जन्माला घालावं लागतं. मुल जन्माला घालू शकले तरच त्यांचं लग्न लावून दिलं जातं. लग्नाआधी बाळाला जन्म घालणे अनिवार्य असल्याची ही देशातील एकमेव प्रथा आहे.
पांडवांची प्रथा
हिमाचल प्रदेशमध्ये किन्नौर जिल्ह्यात एकाच महिलेशी सर्व भावांनी लग्न करण्याची प्रथा आहे. या प्रथेला घोटुल असे म्हणतात. किन्नौर जिल्ह्यातील गुहांमध्ये महाभारत काळात द्रौपदीसोबत पांडव राहायचे. तेव्हापासून ही प्रथा पाळली जाते असे सांगतात.
मामा-भाची अन् चुलत बहीण
दक्षिणेत बहिणीने वडिलोपार्जित संपत्तीत हक्क मागू नये म्हणून बहिणीच्याच मुलीसोबत लग्न करण्याची प्रथा आहे. मामा-भाचीचं हे लग्न केवळ संपत्तीच्या कारणाने होत असतं. तर छत्तीसगडमध्ये धुर्वा आदिवासी जमातीत चुलत भावासोबतच बहिणीचं लग्न लावलं जातं. तसं केलं नाही तर दंड ठोठावला जातो.
India Old Tradition Marriage after Child Birth
Culture Himachal Pradesh