मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतात एकीकडे गरिबी, महागाई, बेरोजगारी असे प्रश्न आ वासून उभे असताना दुसरीकडे चैन करणाऱ्यांचीही कमतरता दिसून येत नाहीये. गरिबी आणि श्रीमंतीतील दरी अधिकच रूंदावत चालली आहे. त्यात देशात मर्सिडीज बेंज, ऑडी आणि बीएमडब्ल्यूसारख्या लक्झरी कंपन्यांच्या महागड्या वाहनांची मागणी वाढत आहे, ही बातमीसुद्धा वरील वाक्याची पुष्टी करणारी आहे. वाढती मागणी आणि पुरवठा यामधील तफावत वाढल्यामुळे अशा मॉडेल्सचा प्रतीक्षा काळ (वेटिंग पीरियेड) वाढला असल्याची माहिती कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग ढिल्लों सांगतात, की गेल्या काही महिन्यांपासून किंवा मी म्हणेन मागील वर्षापासून सी आणि डी श्रेणीतील म्हणजेच ७० ते ७५ लाख रुपयांच्या वाहनांची मागणी वाढली आहे. असे वाहने खरेदी करण्यास सक्षम असलेले म्हणजेच उद्योजक, खेळाडू, बॉलिवूड कलाकार समोर येत असून, लग्झरी उत्पादने खरेदी करत आहेत.
ऑडी इलेक्ट्रिक ई-ट्रॉनचे उदाहरण देताना ढिल्लों म्हणाले, की आम्ही या कारची विक्री एक कोटीहून अधिक किमतीत करत आहोत. भारतात पोहोचण्यापूर्वीच या वाहनांची पूर्णपणे विक्री होते. वाहनांच्या पुरवठ्यामध्ये अडचणी वाढल्याने या वाहनांसाठीचा प्रतीक्षा काळ वाढला आहे. एक ते दोन महिन्यात मिळाणाऱ्या या कार आता चार ते सहा महिन्यांत मिळतात.
मर्सिडिज बेंज इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन श्वेंक सांगतात, की काही वाहनांचा पुरवठा अनेक महिन्यांनी होत असल्यामुळे दुर्दैवाने ग्राहकांना त्या उशिराने मिळत आहेत. विशेषतः जीएलएस आणि जीएलई या एसयूव्हींचा यात समावेश आहे. फक्त पुरवठा हीच समस्या नसून, जागतिक पातळीवरच या कारची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे आम्हाला प्राधान्यक्रम ठरवावा लागत आहे. २०२२ मधील पहिल्या तिमाहीत कंपनीकडे ४ हजारांहून अधिक वाहनांची ऑर्डर होती. मर्सिडिज बेंज इंडियाने २०२१ या वर्षी एक कोटीहून अधिक किमतीच्या जवळपास २ हजार वाहनांची विक्री केली आहे. यामध्ये एस-क्लास मेबॅक, जीएलएस मेबॅक आणि टॉप-अँड एएमजी या वाहनांचा समावेश आहे. कंपनीच्या एकूण वार्षिक विक्रीमध्ये एस-क्लास आणि जीएलएस एसयूव्ही ही वाहने ३० टक्के विक्री होतात.
बीएमडब्ल्यू या कारच्या महागड्या मॉडेल्सच्या मागणीतही प्रचंड वाढ झाली आहे. बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे ध्यक्ष विक्रम पावाह सांगतात, एसएव्ही (स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटी व्हिकल) श्रेणीतील आमची स्थिती भक्कम आहे. एसके एक्स ३, एक्स ४ आणि एक्स ७ मॉडेल्सना मोठी मागणी आहे. या श्रेणीत आम्हाला ४० टक्के वाढ मिळाली आहे. आमच्या पोर्टफोलिओमध्ये या वाहनांची ५० टक्के विक्री होते. बीएमडब्ल्यू इंडियाच्या एसव्ही श्रेणीतील वाहनांची किंमत ६१ लाख रुपयांहून अधिक आहे. या श्रेणीतील १,३४५ वाहनांची पहिल्या तिमाहीत विक्री झाली आहे. ही जवळपास ४० टक्के वाढ आहे.