नवी दिल्ली – साखर हंगाम (ऑक्टोबर -सप्टेंबर) २०२१-२२ मध्ये, देशात ५००० लाख मेट्रिक टन (एलएमटी) पेक्षा जास्त उसाचे विक्रमी उत्पादन झाले. त्यापैकी सुमारे ३५७४ एलएमटी उसाचे गाळप साखर कारखान्यांनी केले आणि सुमारे ३९४ एलएमटी सुक्रोजचे किंवा नैसर्गिक साखरेचे उत्पादन घेतले. यापैकी ३५ एलएमटी साखर इथेनॉल उत्पादनासाठी वळवण्यात आली आणि साखर कारखान्यांकडून ३५९ एलएमटी साखर तयार करण्यात आली. यामुळे भारत हा जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक आणि सर्वाधिक ग्राहक असलेला तसेच जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर निर्यातदार देश ठरला आहे.
हंगामातील आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही आर्थिक साहाय्याशिवाय आत्तापर्यंतची सर्वाधिक म्हणजे सुमारे १०९.८ एलएमटी इतकी विक्रमी साखर निर्यात झाली. आधारभूत आंतरराष्ट्रीय किमती आणि भारत सरकारच्या धोरणामुळे भारतीय साखर उद्योगाने हे यश साध्य केले. या निर्यातीतून देशासाठी ४०,००० कोटी रुपयांचे परकीय चलन प्राप्त झाले.
साखर हंगाम २०२१-२२ दरम्यान, साखर कारखान्यांनी १.१८ लाख कोटींहून अधिक किमतीचा ऊस खरेदी केला आणि भारत सरकारकडून कोणतेही आर्थिक सहाय्य (अनुदान) न घेता १.१२ लाख कोटींहून अधिक पैसे चुकते केले. अशा प्रकारे, साखर हंगामाच्या शेवटी उसाची थकबाकी ६००० कोटी रुपयांपेक्षा कमी राहिली जी असे सूचित करते की उसाची ९५ टक्के थकबाकी चुकती झाली आहे. हे देखील उल्लेखनीय आहे की SS 2020-21 साठी, ९९.९ पेक्षा जास्त उसाची थकबाकी मंजूर झाली आहे.
इथेनॉलच्या विक्रीतून २०२१-२२ मध्ये साखर कारखानदार/डिस्टिलरींनी सुमारे १८००० कोटी रुपयांचा महसूल कमावला. यामुळे शेतकऱ्यांची उसाची थकबाकी लवकरात लवकर देण्यात मोठी मदत झाली आहे. उसाची मळी /साखर-आधारित डिस्टिलरीजची इथेनॉल उत्पादन क्षमता वर्षाला ६०५ कोटी लिटरपर्यंत वाढली आहे आणि पेट्रोलसोबत इथेनॉल मिश्रण कार्यक्रमांतर्गत २०२५ पर्यंत २० टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या दिशेने प्रगती सुरू आहे.