संगीतकार-गायक संजय गीते यांचा कवी देवरे यांच्या निवडक रचनांवर ‘शब्द-सूर संवाद’ कार्यक्रम
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वसाधारणपणे काव्यसंग्रहाचे प्रकाशन तर होतच असते. पण, आज होणाऱ्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन खास आहे. कारण, हा कार्यक्रम साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मैलाचा दगड ठरावा असाच आहे. निमित्त आहे ते इंडिया दर्पण मीडिया हाऊस प्रकाशन संस्थेच्या तिसऱ्या पुस्तकाचे आणि ज्येष्ठ कवी जगदीश देवरे यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाचे. पुस्तक प्रकाशन सोहळ्याचा हा अभिनव प्रयोग असून त्यामुळे हा कार्यक्रम संगीतमय असणार आहे. त्यामुळे या सोहळ्याला उपस्थित राहून आपल्याला ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचा योग आहे. म्हणूनच हा योग चुकवू नका.
जिल्हा न्यायालयातील लघुलेखक पदावर कार्यरत असलेले कर्मचारी व कवी जगदीश देवरे यांच्या इंडिया दर्पण मीडिया हाऊस प्रकाशित ‘चुलीतले निखारे’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन रविवारी सायंकाळी ५ वाजता सावानाच्या ग्रंथालयभूषण मु.शं.औरंगाबादकर सभागृहात होणार आहे. या प्रकाशन सोहळ्यात सोर्स म्युझिक स्टुडिओचे नामवंत संगीतकार-गायक संजय गीते हे कवी देवरे यांच्या निवडक रचनांवर आधारित ‘शब्द-सूर संवाद’ हा छोटेखानी कार्यक्रम सादर करणार आहे.
पुस्तक प्रकाशन सोहळ्याचा हा अभिनव प्रयोग असून त्यामुळे हा कार्यक्रम संगीतमय असणार आहे. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नाशिकचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी.जगमलानी, जिल्हा न्यायाधीश विकास कुलकर्णी, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) आर.एस.करंकाळ, नाशिक वकील संघाचे अध्यक्ष आणि मविप्र सरचिटणीस अॅड.नितीन ठाकरे, ज्येष्ठ समीक्षक प्राचार्य डॉ.दिलीप धोंडगे, कवी देवीदास चौधरी, डॉ.डी.एम.गुजराथी, डॉ.प्रताप गुजराथी (मनमाड) या मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन कवी रवींद्र मालुंजकर करणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याचे आवाहन वैशाली देवरे, मनाली देवरे, पराग पाटोदकर, उत्कर्ष शाह, इंडिया दर्पणचे संपादक गौतम संचेती, कार्यकारी संपादक भावेश ब्राह्मणकर यांनी केले आहे.