नाशिक – इंडिया दर्पण मीडिया हाऊस व मनमाड येथील कवी रविंद्रनाथ टागोर एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने कवी रविंद्रनाथ टागोर हायस्कूलचे प्राचार्य मुकेश बी. मिसर यांच्या ‘दी इंग्लिश मॅन्युअल’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मंगळवारी सायंकाळी ६ वाजता मनमाड येथील कवी रविंद्रनाथ टागोर स्कूलच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. या पुस्तकाचे प्रकाशन गोदावरी अर्बन को ऑप बँकेच्या चेअरमन, जिल्हा परिषद सदस्या, आर्किटेक्ट अमृताताई पवार यांच्या शुभहस्ते होणार आहे. इंडिया दर्पण प्रकाशनाचे हे दुसरे पुस्तक असून याअगोदर अनवट वाट स्टेशन मास्तरची हे आत्मचरित्र प्रसिध्द झाले आहे.
अवघ्या २१ महिन्यात इंडिया दर्पण वेब न्यूज पोर्टलने साडेचार कोटीच्या आसपास views मिळवले असून ते वाचकांच्या पसंतीस उतरले आहे. झटपट बातम्या देण्याबरोबरच इंडिया दर्पणने पुस्तक प्रकाशनही सुरु केले. त्यातूनचे हे पुस्तक आता वाचकांच्या हाती पडणार आहे. या प्रकाशन सोहळ्यास शिक्षक, विदयार्थी, पालक व शिक्षणक्षेत्रातील मान्यवर यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन लेखक मुकेश मिसर, प्रकाशक व इंडिया दर्पणचे संपादक गौतम संचेती, इंडिया दर्पणचे कार्यकारी संपादक भावेश ब्राह्मणकर, सांस्कृतिक संपादक देवीदास चौधरी यांनी केले आहे.
२० वर्षाच्या अनुभवानंतर पुस्तक
पुस्तकाचे लेखक मुकेश मिसर हे मनमाड येथील कवी रविंद्रनाथ टागोर एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक चेअरमन असून फिनिक्स स्पोकन इंग्लिश क्लासेसचे संस्थापक आहेत. मागील २० वर्षांपासून शिक्षक म्हणून इंग्रजी विषय शिकविण्याचा अनुभव व फिनिक्स स्पोकन इंग्लिशच्या माध्यमातून विदयार्थ्यांना इंग्रजीत प्रभावी संभाषण व लेखनकौशल्य अवगत करून दिले जातात. मर्यादित वेळेत शास्त्रशुध्द पध्दतीने विदयार्थ्यांना इंग्रजी भाषा शिकविल्यास विदयार्थी भाषिक कौशल्यात सक्षम होतात व विदयार्थ्यांमध्ये इंग्रजीमधून संवाद व लेखन कौशल्य विकसीत करता येते. ही बाब व २० वर्षाच्या अनुभवाच्या आधारे दी इंग्लिश मॅन्युअल हे पुस्तक तयार केलेले आहे.
साधी भाषा व अनेक उदाहरणे
पुस्तकात अत्यंत साधी भाषा व अनेक उदाहरणे व आवश्यक त्या ठिकाणी चित्रांचा व मराठी भाषेचा केलेला समर्पक वापर इंग्रजी भाषेची भिती घालविण्यास मदत करते. या पुस्तकाचा वापर विदयार्थी, शिक्षक व घरात विदयार्थ्यांचा इंग्रजी विषयाचा अभ्यास घेणारे पालक सहज करू शकतात इतके ते सुलभ आहे. पुस्तकात पारंपारिक, क्लिष्ट व्याकरण, त्यांचे असंख्य नियम यांना फाटा देवून विविध नकाशे, चित्रे, दैनदिन जीवनाशी निगडीत घटक, ट्री डायग्राम इ. गोष्टीचा परिणामकारक वापर केलेला आहे.
पुस्तकात एकूण ९ विभाग आहेत
पुस्तकात एकूण ९ विभाग आहेत. प्रत्येक विभागातील प्रकरणाची मांडणी नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे व वाचकांची गरज लक्षात घेवून केलेली आहे. त्यामुळे इंग्रजी भाषेचे मूलभूत ४ कौशल्य जसे श्रवण, संभाषण, वाचन व लेखन शास्त्रशुध्द पध्दतीने विकसित करता करता विदयार्थ्यांना पुस्तकात दिलेल्या उपक्रमामुळे स्वयं अध्ययनाची गोडी लागते. स्वतंत्र व नवनवीन विचार करण्यास ते प्रवृत्त होतात. त्यांच्यातील जिज्ञासा विकसीत होण्यासाठी पुस्तकात विविध उपक्रम दिलेले आहेत. मुबलक स्वाध्याय शिक्षक, पालक व विदयार्थी यांना मुल्यमापनाकरीता दिलेले आहेत. प्रत्येकाकडे हे एक संदर्भ पुस्तक म्हणून संग्रही असावे.