नाशिक – जळगावहून ६८ वर्षापासून प्रकाशित होणा-या दैनिक जनशक्तीचे व १६ महिन्यात तब्बल अडिच कोटी दर्शकांनी पसंती दिलेल्या इंडिया दर्पणच्या कार्यालयाचे उदघाटन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॅा. भारतीताई पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. व्दारका परिसरातील खरबंदा पार्क येथे दोन्ही माध्यमाचे एकत्रीत कार्यालयाच्या या शुभारंभ सोहळ्याला विविध मान्यवरांनीही कोरोनाचे नियम पाळत हजेरी लावली. ४ फेब्रुवारी रोजी श्रीगणेश जयंतीच्या शुभमुहूर्तावर दैनिक जनशक्तीच्या नाशिक आवृत्तीचा प्रकाशन सोहळा होणार आहे. त्याअगोदर कार्यालयाचे उदघाटन आज संपन्न झाले.
या उदघाटन सोहळयाला दैनिक जनशक्तीचे संपादक योगेश्वर (यतीन) ढाके, व्यवस्थापक धन्यकुमार जैन, इंडिया दर्पणचे संपादक गौतम संचेती, कार्यकारी संपादक भावेश ब्राह्मणकर, सााहित्य व सांस्कृतिक संपादक देवीदास चौधरी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या उदघाटन प्रसंगी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॅा. पवार यांनी इंडिया दर्पण व जनशक्तीचे कौतुक केले. त्या म्हणाल्या की जळगावहून प्रकाशित होणारे दैनिक जुने असून त्यांची परंपरा मोठी आहे. तर इंडिया दर्पण न्यूज पोर्टलमुळे नाशिकमध्ये काय घडते हे सहज आम्हाला कळते. सतत अपडेट असल्यामुळे त्याची माहिती क्षणात मिळते. त्याचप्रमाणे बातम्यात विश्वासार्हता असल्यामुळे त्या वाचनीय असतात. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात न्यूज वेब पोर्टल व दैनिक एकत्र आल्याचा पहिला प्रयोग असल्याचे सांगत कौतुकही केले.
खरं तर कोरोना काळात उद्योग व व्यवसायावर मोठा परिणाम झाला. त्यात प्रसार माध्यमे वाचली नाही. त्यांच्यावरही मोठा आघात झाला. अनेक मोठ्या वृत्तसंस्था अडचणीत आल्या. तर देशभरात अनेक पत्रकारांनी आपल्या नोक-या गमावल्या. पण, अशा स्थितीत नवीन मार्ग इंडिया दर्पणने वेगळी वाट शोधली. त्याला वाचकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. त्यामुळे १६ महिन्यात या पोर्टलला तब्बल अडिच कोटी दर्शकांनी पसंती दिली. एका जिल्हयातील पोर्टलला व त्यात कोणताही ब्रॅण्ड नसतांना इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळणे तसे अवघड. पण, ते या पोर्टलला मिळाले. त्यामुळेच इंडिया दर्पणच्या या यशात भर घालण्यासाठी जळगावहून ६८ वर्षापासून प्रकाशित होणा-या दैनिक जनशक्तीने जॅाइंट व्हेंजर करुन त्यांच्या सहकार्याने नाशिकमध्ये अंक सुरु करण्याचा निश्चय जनशक्तीने केला. आज या दोन्ही माध्यमाच्या कार्यालयाचे आज उदघाटन झाले.
तापीकाठचे दैनिक ‘जनशक्ती’ आता गोदातीरी
तापीकाठचे दैनिक ‘जनशक्ती’ आता गोदातीरी प्रकाशित होणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील आघाडीचे दैनिक म्हणून जनशक्ती प्रसिध्द आहेच. गेल्या ६८ वर्षापासून जळगाव, धुळे, नंदूरबार येथून एकाचवेळी ते अखंडपणे प्रकाशित होत आहे. पण, आता ‘इंडिया दर्पण’ आणि दै. ‘जनशक्ती’ आता नाशिककरांच्या बळाला अधिक पाठबळ देण्यासाठी सज्ज झाले आहे. खान्देशचा मान आणि नाशिककरांची शान राखणाऱ्या दै. ‘जनशक्ती’च्या अंकाचा शुभारंभ ४ फेब्रुवारीला होणार असल्याचे जनशक्तीचे संपादक योगेश्वर (यतीन) ढाके यांनी सांगितले. या उदघाटन सोहळ्याला प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण सावजी, भाजपच्या नगरसेविका अर्चना थोरात, इंडिया दर्पण जाहिरात व्यवस्थापक राहुल भदाणे, पत्रकार दिनेश ठोंबरे यांची उपस्थिती होती.