नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्याचे युग हे डिजिटल युग आहे. हल्ली प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतो, अशावेळी शेतकऱ्यांनीही मागे राहू नये. जागतिक बाजारपेठेत आपला माल पोहोचावा यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन राज्यस्तरीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्केटिंगचे तंत्र वापरावे. यापुढील काळात शेतकऱ्यांनी मार्केटिंगचा पायंडा पाडणं गरजेचं आहे, असे मत नाशिक पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी व्यक्त केले.
नाशिकचे दबंग, धडाकेबाज पोलीस अधीक्षक अशी ओळख असणारे नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचा प्रवास, वेगवेगळे अनुभव इंडिया दर्पण फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून उलगडण्यात आले. बागेश्री पारनेरकर हिने मुलाखत घेतली. आयपीएस होण्यापर्यंतचा प्रवास सांगताना ते म्हणाले की, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना पहिल्या दोन वेळेस मुलाखतीच्या टप्प्यापर्यंत पोहोचूनही नोकरी मिळाली नाही. त्यावेळी काही क्षण खचून गेल्यासारखं वाटलं. घरी सांगितलं की हा काही माझा पिंड नाही, घरची शेती आहे तर त्याकडे लक्ष द्यावे असा विचार केला. अशावेळी वडिलांनी आधार दिला, स्वतःच्या क्षमतेवर अविश्वास दाखवू नको आणि खचून जाऊ नको, प्रामाणिकपणे प्रयत्न करत रहा, यश नक्की मिळेल. वडिलांच्या आणि कुटुंबाच्या साथीमुळे आज मी इथपर्यंत पोहोचू शकलो, असे त्यांनी सांगितले.
नाशिककरांच्या प्रेमाविषयी बोलताना ते म्हणाले की नाशिकचे लोक अतिशय प्रेमळ आहेत, वेळोवेळी सहकार्य करतात. नाशिक ग्रामीणची लोकसंख्या जवळपास ६५ लाख आहे आणि ग्रामीण पोलीसदल ३६०० आहे. युनिफॉर्म मधल्या पोलीस दलाबरोबरच ६४ लाख जनता हे सुद्धा माझे पोलीस दल आहेत. कारण आम्हाला मदत करणारे हे नागरिकच आहेत. प्रत्येक नागरिकाला वाटत की माझा भाग शांत राहावा, गुन्हेगारी नसावी आणि त्यासाठी नागरिक पूर्ण मदत करतात. प्रत्येक व्यक्तीत पोलीस दडलेला असतो फक्त त्याला बाहेर काढणं गरजेचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. लहानपणीच्या आठवणी सांगताना ते म्हणाले की लहानपणापासून सांगितले जाते पोलीस, कोर्ट आणि हॉस्पिटलची पायरी चढू नये. पण मी आता पोलीस दलात काम करत आहे तर पोलीस हे आपले शत्रू नसून मित्र आहेत ही भावना रुजवण्याचा मी प्रयत्न करत आहे. लोकांच्या मनातील पोलिसांविषयी भीती काढणं आवश्यक आहे. त्याची सुरुवात मी शाळेपासून केली. शाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी बोलून, त्यांना मार्गदर्शन केलं तर पोलीस हे आपले मित्र आहेत ही संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे रुजेल.
आजच्या डिजिटल युगात पोलीस दलही मागे नाही. नागरिक ऑनलाइन तक्रारही नोंदवू शकतात. ऑनलाइन माध्यमाचा वापर ही आजच्या काळाची गरज आहे. तसेच तरुणांनी आपण देशाचे भवितव्य आहोत हे लक्षात घेऊन प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. व्यसनाधीनता, ऑनलाइन गेमिंगच्या आहारी न जाता जिद्दीने आपल्या आवडत्या क्षेत्रात उंच भरारी घ्या, असा सल्ला त्यांनी तरुणांना दिला.
ही मुलाखत पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे