नाशिकमध्ये ‘वेगळा’ प्रयोग
कोरोनामुळे वर्तमानपत्रांच्या जगामध्ये बरीच उलथापालथ झाली. सुरुवातीच्या काळात वृत्तपत्रांचे वितरण बंद असणे, नंतर टप्प्याटप्प्याने ते सुरु होणे, वाचकांना ती ऑनलाईन वाचण्याची सवय लागणे, परिणामी आज कोरोना काढता पाय घेत असल्याचे संकेत मिळत असतानाही वृत्तपत्रांचे वितरण कोरोनापूर्व काळाइतके १०० टक्के न होणे अशा अनेक समस्या आजही भेडसावत आहेत. मधल्या काळात अनेक पत्रकारांनी वैयक्तिक पातळीवर ऑनलाईन चा आधार घेण्याचा प्रयत्न केला. ९० टक्के लोक त्यांच्या website चे रूपांतर व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी करण्यात अयशस्वी ठरले. जे यशस्वी ठरले ते तगले. त्यातील एक महत्वाची website म्हणजे https://indiadarpanlive.com. नाशिक जिल्हा आणि आसपासच्या बातम्यांना प्राधान्य द्यायचा प्राथमिक हेतू असला तरी आधी महाराष्ट्र, नंतर हळूहळू देशाच्या पातळीवरच्या बातम्या दिसायला लागल्या. हजारो वाचक Whatsapp ग्रुपच्या माध्यमातून जोडले गेले. टेलिग्राम, फेसबुक आणि You Tube च्या माध्यमातून जोडले गेले.
आतापर्यंत जवळपास सव्वातीन कोटी लोकांनी या website चा लाभ घेतला हे फक्त सव्वा वर्षाच्या काळात झाले. ‘आमचे प्रिंट माध्यमच खरे, ऑनलाईन म्हणजे timepass ‘ असे कुत्सितपणे बोलणाऱ्यांना ही सणसणीत चपराक होती / आहे. प्रिंट माध्यम ताकदवान आहेच, त्याबद्दल दुमत नाही. परंतु ऑनलाईनला बदलत्या काळातही कमी लेखण्याचा विचार कसा केला जातो ते कळत नाही. असो. जळगावहून निघणारे ‘जनशक्ती’ हे दैनिक आणि गौतम संचेती, भावेश ब्राह्मणकर, देविदास चौधरी यांनी अत्यंत श्रमाने घडवलेले Indiadarpanlive.com हे मिळून आज संयुक्तपणे ‘जनशक्ती’ची नाशिक आवृत्ती सुरु करत आहेत. प्रत्येक वर्तमानपत्राची website असतेच, परंतु दोन स्वतंत्र कंपन्यांची माध्यमे, तीही प्रिंट व website, एकत्र येऊन प्रिंट आवृत्ती सुरु करतात हे महत्वाचे आहे. हा कार्यक्रम आज नाशिकला मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. या नवीन प्रयोगाला मन:पूर्वक शुभेच्छा!
(संदर्भासाठी त्यांच्यावर मी एप्रिलमध्ये लिहिलेल्या लेखाची लिंक देत आहे – https://ashokpanvalkar.com/darpan-ind/ )