मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जगाभरात काही ठिकाणी कोरोनाचा कहर सुरूच आहे. भारतात मात्र वेगळेच चित्र आहे. करोनाची तिसरी लाट ओसरुन दहा महिन्यांचा कालावधी लोटला आहे. गेल्या वर्षी जून आणि जुलैचे दोन महिने सोडले तर करोना बाधितांच्या संख्येचा आलेख घसरता राहीला आहे. नव्या लाटेचा धोका नसल्याचाही विश्वास जाणकार व्यक्त करीत आहेत.
युरोपमध्ये आजही दैनंदिन ८० हजारपेक्षा जास्त करोना बाधितांची नोंद होत आहे, जपानमध्ये हेच प्रमाण एक लाखाच्या घरात आहे, अमेरिकेत ४० हजार एवढं आहे तर चीन आत्तापर्यंतच्या सर्वांत मोठ्या करोना लाटेचा सामना करत आहे. भारतात मात्र वेगळीच स्थिती आहे. दहा महिन्यात लाट न येणे, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत डेल्टा आणि ओमायक्रॉनची बहुसंख्यांना झालेला बाधा, त्यानंतर झालेले मोठ्या प्रमाणात लसीकरण यामुळे करोनाचा प्रभाव भारतात नगण्य झाल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
नव्याने लसीकरणाचीही गरज नाही
जीनोमिक्स आणि एकात्मिक जीवशास्त्र संस्थेचे माजी संचालक अनुराग अगरवाल यांच्या मतानुसार देशामध्ये बहुसंख्य लोकांमध्ये करोनाचा सामना करण्यासाठी पुरेशी प्रतिकारशक्ती आहे. परिणामी विषाणूचा प्रभाव नगण्य राहीला आहे. आता चौथा बुस्टर डोस देण्याची आवश्यकता सध्या तरी वाटत नाही. करोनाचे संक्रमण झाले आणि नवा विषाणू तयार झाला तरच ही शक्यता असल्याचे ते म्हणाले.
करोनाची पुढची लाट येणार का?
अनुराग अगरवाल, शाहीद जमील यांच्या मते भारतात यापुढे करोनाची लाट येण्याची शक्यता जवळपास दिसत नाही. करोना विषाणूमध्ये नवे संक्रमण होत नवीन विषाणू सध्या तरी तयार झालेला नाही. सध्या जो विषाणू दिसत आहे तो ओमायक्रॉनचा उपप्रकार आहेत असे अगरवाल यांनी सांगितले. तर भारतासह जगभरात करोनाचा संसर्ग झालेला आहे, प्रतिकारशक्ती तयार झालेली आहे. तेव्हा विषाणूचे म्युटेशन होत नवा विषाणू तयार होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही. वेगाने संसर्ग होईल अशा विषाणूच्या तयार होण्याची शक्यताही सध्या वाटत नाही असे मत जमील यांनी व्यक्त केले.
India Covid 19 Threat New Wave Expert Says
Corona