नवी दिल्ली (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क) – भारतात पुन्हा एकदा कोरोना विषाणूची रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशात २२,७५५ नवे कोविडचे रुग्ण नोंदविण्यात आले. गेल्या वर्षीच्या २६ डिसेंबरपासून कोरोना रुग्णसंख्या दररोज वाढ होत आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, महामारीची तिसरी लाट याआधीच सुरू झाली आहे. डेल्टा व्हेरिएंटची जागा ओमिक्रॉन घेत आहे. फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात कोरोना रुग्णसंख्या सर्वोच्च पातळीवर पोहोचू शकते. त्यादरम्यान दररोज दोन लाखांच्या आसपास आढळू शकतात.
कोरोनाचे नवे रुप ओमिक्रॉनने शिरकाव केल्याच्या काही दिवसांतच देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. गेल्यावर्षी २६ डिसेंबरपासून दैनिक रुग्णसंख्या वाढली होती. डिसेंबरच्या मध्याला कोरोनाचे ६ हजार रुग्ण दररोज आढळत होते. परंतु अचानक रुग्णसंख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्क केले आहे.
तज्ज्ञ सांगतात…
तिसर्या लाटेसंदर्भात वैज्ञानिकांचे वेगवेगळे अंदाज आहेत. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के पॉल सांगतात, की ही बाब नागरिकांच्या लसीकरणावर अवलंबून आहे. एका प्रभावी रणनीतीच्या माध्यमातून कोरोना संसर्गाचा प्रसार रोखला जाऊ शकतो. त्यामुळे कोरोनाच्या तिसर्या लाटेची शक्यता कमी आहे. ओमिक्रॉनमुळे कोरोना रुग्ण वाढतील, परंतु डेल्टाच्या तुलनेत अधिक गंभीर नसतील. फेब्रुवारी-मार्चपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास सांगतात, महाराष्ट्रात जानेवारीच्या तिसर्या आठवड्यापर्यंत एकूण दोन लाख रुग्ण आढळू शकतात. एएनआयशी बोलताना ते म्हणाले, की राज्यातील वाढत्या कोविड रुग्णांच्या प्रवृत्तीच्या आधारावरून जानेवारी २०२२ च्या तिसर्या आठवड्यापर्यंत जवळपास दोन लाख सक्रिय रुग्ण असण्याची शक्यता आहे. ओमिक्रॉन जास्त घातक नाहीय. भ्रामक असू शकतो. ज्या नागरिकांनी लस घेतली नाही त्यांच्यासाठी तसेच इतर आजार असलेल्या रुग्णांना घातक ठरू शकतो.
मार्चमध्ये कहर
आयआयटी कानपूरचे प्रा. मणिंद्र अग्रवाल यांच्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांची सर्वोच्च पातळी मार्चच्या सुरुवातीला प्रतिदिन जवळपास १.८ लाख रुग्णांसह असेल. दहापैकी एक रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असेल.