नवी दिल्ली – देशात कोरोना विषाणू पहिल्यापेक्षा घातक होत चालला आहे. गेल्या पाच दिवसात जवळपास सहा लाखांहून अधिक भारतीय लोक कोरोनाबाधित झाले आहेत. एका दिवसात सर्वाधिक १.४५ लाख रुग्ण आढळले आहेत. जगातील इतर देशांच्या तुलनेत ही आकडेवारी सर्वाधिक आहे.
देशात ४५ टक्के सक्रिय रुग्ण १० जिल्ह्यांत आहेत. कोरोनाच्या दुसर्या लाटेचा परिणाम प्रत्येक राज्यात दिसत नाहीये. परंतु दहा राज्य सर्वात कठिण काळातून जात आहेत. गेल्या एका दिवसात १,४५,३८४ रुग्ण आढळले आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले.
त्यामध्ये ८३ टक्के रुग्ण महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानमध्ये आढळले आहेत. एकट्या महाराष्ट्रात ५८,९९३ रुग्ण, छत्तीसगडमध्ये ११,४४७ आणि उत्तर प्रदेशमध्ये १२.७८७ रुग्ण आढळले आहेत. त्यासोबतच सक्रिय रुग्णसंख्या वाढून १०,४६,६३१ इतकी झाली आहे. १६-१७ सप्टेंंबरला देशात सर्वाधिक ९७ हजार रुग्ण एका दिवसात आढळले होते. तेव्हा सक्रिय रुग्णसंख्या १० लाखांहून अधिक होती. परंतु या वर्षी हा आकडा एप्रिलमध्ये समोर आला आहे.
सक्रिय रुग्णसंख्या दर ७.९३ टक्के
देशात सध्या सक्रिय कोरोनारुग्णांचा दर ७.९३ टक्के आहे. गेल्या एका दिवसातच ६७,०२३ सक्रिय रुग्ण वाढले आहेत ही आतापर्यंतची सर्वाधिक रुग्ण वाढ समजली जात आहे. त्याशिवाय एका दिवसात ७७,५६७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. परंतु बरे होण्याच्या दरात याचा फायदा झालेला दिसत नाही. दररोज नवे रुग्ण वाढत असल्यामुळे बरे होण्याचा दर (रिकव्हरी रेट) घटून ९०.८० टक्के एवढा झाला आहे. देशात शुक्रवारी ७९४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यातील ८७ टक्के मृत्यू रुग्णसंख्या वाढलेल्या त्याच १० राज्यातील आहेत.
४० दिवसात सातपट वाढले मृत्यू
कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेत सातपटहून अधिक मृत्यू होत आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत देशात सरासरी १००-१२० लोकांचा मृत्यू होत होता. परंतु हा आकडा ७८०-७९४ च्या घरात पोहोचला आहे. अशीच आकडेवारी गेल्या वर्षी जून-जुलैपासून नोव्हेंबरपर्यंत पहायला मिळाली होती. त्यादरम्यान सरासरी ५०० लोकांचा मृत्यू झाला होता. गेल्या सप्टेंबरमध्ये एका दिवसात सर्वाधिक ११०० मृत्यू झाले होते.
या जिल्ह्यात परिस्थिती गंभीर
जिल्हा सक्रिय रुग्ण
पुणे – ९.५६ टक्के
मुंबई – ८.४१ टक्के
ठाणे – ६.४५ टक्के
नागपूर – ६.०२ टक्के
बंगरुळू सिटी- ४.०६ टक्के
नाशिक – ३.६६ टक्के
दिल्ली – २.५४ टक्के
रायपूर – १.७८ टक्के
दुर्ग – १.७६ टक्के
औरंगाबाद- १.६२ टक्के