नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ब्राम्होस हे नाव ऐकताच आपल्या मनात गती, अचुकता असे विचार येतात. मात्र, ब्राह्मोसचेदेखील मिसफायर होत असल्याचा प्रकार पुढे आला आहे. मुख्य म्हणजे मिसफायर होऊन ब्राम्होस शेजारी राष्ट्र असलेल्या पाकिस्तानात पडले. या चुकीमुळे तब्बल २४ कोटींचा भुर्दंड सरकारला बसला आहे. यासंदर्भात दस्तुरखुद्द केंद्र सरकारनेच उच्च न्यायालयात माहिती दिली आहे.
मागील वर्षी अपघाताने पाकिस्तानात डागल्या गेलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्रामुळे सरकारी तिजोरीला २४ कोटींचा भुर्दंड बसला. तसेच शेजारी देशासोबतचे संबंधही ताणले गेले. दिल्ली उच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात केंद्र सरकारने ही माहिती दिली आहे. त्या चुकीसाठी हवाईदलाच्या तीन अधिकाऱ्यांची सेवा समाप्त करण्याच्या कारवाईचे सरकारकडून समर्थन करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, केंद्र सरकारने न्यायालयात भारतीय हवाई दलाच्या तीन विंग कमांडरना बडतर्फ केल्याचे समर्थन केले आहे.
दरम्यान, विंग कमांडर अभिनव शर्मा यांनी बडतर्फीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. विंग कमांडर अभिनव शर्मा यांच्या बडतर्फीच्या विरोधात सरकारने दिलेल्या माहितीनुसार, कोर्ट मार्शलच्या वेळी अधिकाऱ्यांना पूर्ण सुविधा देण्यात आल्या होत्या आणि त्यांची बाजू मांडण्यासाठी त्यांना पूर्ण वेळ देण्यात आला होता.
एसओपीचे केले पालन
विंग कमांडर अभिनव शर्मा यांनी हवाई दल कायदा, १९५० च्या कलम १८ नुसार त्यांच्या विरोधात जारी केलेल्या बडतर्फीच्या आदेशाला आव्हान दिले. घटनेच्या वेळी ते अभियांत्रिकी अधिकारी म्हणून तैनात होते. अभिनव शर्मा यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे, त्यांना फक्त देखभालीचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यांना ऑपरेशनल ट्रेनिंग देण्यात आलेले नव्हते. त्यांनी आपले कर्तव्य चोख बजावले आणि ऑपरेशनचे संचालन करणाऱ्या सर्व लढाऊ एसओपीचे पालन केले आहे.
India Brahmos Missile Misfire Loss Crore Rupees