नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई आणि नवी दिल्ली या दोन ठिकाणी अॅपल कंपनीने त्यांचे दोन रिटेल स्टोअर्स भारतात उघडली आहेत. कंपनीचे सीईओ टीम कुक यांनी या दोन्ही स्टोअर्सचे उदघाटन केले आहे. दोन्ही स्टोअर्सच्या उदघाटनावेळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. आता या दोन्ही रिटेल स्टोअर्सबद्दल एक वेगळीच माहिती समोर आली आहे.
महिन्याला होते एवढी विक्री
अॅपल चे सीईओ टीम कुक यांनी भारतात अॅपल BKC आणि अॅपल Saket या भारतातील दोन रिटेल स्टोअर्सचे उदघाटन केले. या दोन्ही स्टोअर्सनी मिळून तब्बल ४४ ते ५० कोटींची मासिक विक्री केली आहे. यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे अॅपल आपल्या मुंबई आणि दिल्लीमधील स्टोअरसाठी अनुक्रमे ४० आणि ४२ लाख रुपये इतके मासिक भाडे देत आहे. सन २०२७पर्यंत, आयफोन निर्माता संपूर्ण आशिया-पॅसिफिक प्रदेशात १५ नवीन स्टोअर्स, युरोप आणि मध्य पूर्वेतील ५ आणि यूएस आणि कॅनडामध्ये ४ अतिरिक्त आउटलेट्स उघडण्यावर चर्चा करत आहे, तसेच कंपनीने आशियातील ६ युरोपमधील ९ आणि उत्तर अमेरिकेतील १३ स्टोअर सुधारित किंवा पुनर्स्थापित करण्याचे देखील लक्ष्य ठेवले आहे.
पहिल्या दिवसाचा गल्ला
उद्योग क्षेत्रातील ही आकडेवारी भारतातील कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स स्टोअरच्या कमाईच्या तुलनेत दुप्पट आहे. या आकडेवारीमुळे अॅपल स्टोअर हे महसुलाच्या बाबतीत भारतामध्ये सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील विक्रेता बनले आहे. विशेष म्हणजे अॅपल बीकेसी सुरू झाले त्या दिवशी तिथे १० कोटी रूपयांची विक्री झाली. एक मोठे इलेक्ट्रॉनिक्स स्टोअर महिन्याला ७ ते ८ कोटी कमावते असे एका रिपोर्टमध्ये दिसून आले आहे.
वास्तविक अॅपल साकेत हे दिल्लीमधील स्टोअर बीकेसी स्टोअरपेक्षा लहान आहे. तरीदेखील साकेत स्टोअरने चांगली कामगिरी केली आहे. दोघांच्या आकारामध्ये प्रचंड फरक असून देखील दोन्ही स्टोअर्सनी सामान मासिक विक्रीची नोंद केली आहे. या दोन्ही स्टोअरमध्ये सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी ६ हजार पेक्षा जास्त ग्राहकांची गर्दी झाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच दोन्ही स्टोअर्सनी नवीन रेकॉर्ड केला कारण त्यांची सरासरी विक्री किंमत इतर ब्रँड्सच्या तुलनेत खूप जास्त आहे.
India Apple Mumbai Delhi Store Revenue