मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र सरकारने गॅस किंमतीबाबत निर्णय घेतल्यानंतर आज उध्दव ठाकरे यांनी त्यावर टीका केली. त्यांनी सांगितले की, केंद्र सरकार सध्या गॅसवरती आहे. इंडिया आघाडीची ताकद वाढेल तेव्हा केंद्र सरकार गॅस सुद्धा मोफत देईल. गेल्या ९ वर्षांत रक्षाबंधन झाले नव्हते का ? त्यावेळी केंद्र सरकारने गॅसची दरवाढ का कमी केली नाही असेही त्यांनी सांगितले.
गुरुवारपासून मुंबईत इंडिया आघाडीची ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी दोन दिवसांची बैठक होणार आहे. या बैठकीची माहिती देण्यासाठी इंडिया आघाडीची पत्रकार परिषद हॉटेल ग्रँड हयातमध्ये झाली. त्यावेळ उध्दव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी आमची तिसरी बैठक होत आहे आणि आता गॅस सिलेंडरचे दर कमी झाले आहेत. आमची बैठक जसजशी पुढे जाईल तसं दर कमी होतील. आम्ही जसे पुढे जाऊ तसं कमी होतील. काही दिवसात तर गॅस मोफत दिलं जाईल कारण सरकार स्वत: गॅसवर आहे. त्यामुळे सिलेंडरचे भाव कमी केले असतील तर मला काही आश्चर्य वाटत नाही. यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितसोबत आमची युती असल्याचे सांगितले. इंडिया आघाडीत त्यांना घेण्याविषयी चर्चा होईल. आंबेडकर यांची इंडिया आघाडीत येण्याची इच्छा आहे का, ते विचारावे लागेल असेही त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकांना देशात परिवर्तन हवे आहे. अनेक राज्यातून आम्हाला, इंडिया आघाडीला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. २८ पक्ष आणि त्यांचे प्रतिनिधी या बैठकीत हजेरी लावणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले की, आम्ही शाहु-फुले-आंबेडकर यांचे विचारधारा पुढे घेऊन जाणार आहोत. इंडिया आघाडीत ३६ पक्ष आले आहे. पूर्वी हा आकडा २८ इतका होता.