मुंबईत (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईत आजपासून इंडिया आघाडीची बैठक सुरू होत आहे. राज्यात तीन आठवड्यांपासून पाऊस गडप झालाय. बळीराजाची चिंता वाढलेली आहे. दुष्काळाचं संकट गहिरं होतंय. मविआ नेते एकीकडे राज्यात दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करतायत आणि दुसरीकडे इंडिया आघाडी बैठकीआधी राज्याच्या राजधानीत पुरणपोळी, करंजी, मोदक अशा पंचपक्वान्नाच्या पंगती उठतायत. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळताना या नेत्यांना लाजही वाटत नाही, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे सरचिटणीस अमेय खोपकर यांनी टीका केली आहे. सत्तापिपासू नेत्यांच्या या भाऊगर्दीत जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणारा एकच पक्ष आहे आणि मी अशा मनसे पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे याचा मला अभिमान आहे असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
मुंबईत ग्रँड हयात हॉटेलमध्ये दोन दिवस ही बैठक चालणार आहे. या बैठकीसाठी एकूण २८ पक्षांचे नेते येणार आहेत. या नेत्यांना खास मराठमोळ्या पदार्थांचा अस्वाद घेता यावा यासाठी सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणासाठी मराठमोळे खाद्यपदार्थ ठेवण्यात आले आहेत. झुणका भाकरपासून ते पुरणपोळी पर्यंतच्या पारंपारिक आणि मराठी पदार्थांचा यात समावेश आहे. त्याचबरोबर नाश्त्याला बाकरवडी, नारळी वडी, नाचणीचे वेफर्स आणि वडापाव ठेवण्यात आला आहे. तसेच सोबत चहा आणि कॉफींसह नारळपाणी, लिंबूपाणई तसेच फळांचा रसही ठेवण्यात आला आहे. जेवणात श्रीखंड पुरी, भरलेल्या वांग्यासहीत शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची रेलचेलही आहे.
या बैठकीसाठी ग्रँड हयात हॉटेलमध्ये १०० हून अधिक रुम बुक करण्यात आले आहेत. महाविकास आघाडी या बैठकीची संयोजक असली तरी उद्धव ठाकरे हेच या बैठकीच्या नियोजन करत आहे. तुतारी आणि नाशिक ढोल वाजवून या पाहुण्यांचं स्वागत केले गेले आहे. एकुणच या पाहुणचारावर मनसेने निशाणा साधला असून त्यांनी थेट जेवणावळीवरच टीका केली आहे.