नाशिक – महापालिकेतील अपक्ष नगरसेवक गुरुमीत बग्गा यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक येत्या फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणार आहे. म्हणजेच, निवडणुकीच्या आधीच त्यांनी राजीनामा दिला आहे. बग्गा यांना काँग्रेस शहराध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली आहे. त्यांनी ती स्विकारली आहे. त्यामुळेच त्यांनी अपक्ष म्हणून नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. बग्गा हे आता काँग्रेसचे प्राथमिक सदस्यत्व स्विकारणार आहेत. त्यानंतर लगेच त्यांना शहराध्यक्ष केले जाणार आहे.
बग्गा हे पंचवटी विभागातून निवडून येतात. बग्गा हे पूर्वी युवक काँग्रेसचे कार्य करीत होते. त्यानंतर त्यांना स्वीकृत नगरसेवकपद देण्यात आले. अत्यंत अभ्यासू नगरसेवक अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळेच त्यांनी महापालिकेत आपल्या कामाचा ठसा उमटवला. आपल्या प्रभागात विविध विकास कामे केली. त्याशिवाय महापालिकेच्या सभागृहामध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण ते करत असतात. त्यांनी उपमहापौरपदही भूषविलेले आहे. पक्षाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी अपक्ष अर्ज भरला आणि ते निवडून आले. आता काँग्रेस पक्षाने त्यांना शहराध्यक्षपदाची ऑफर दिली आहे. सध्या हे पद प्रभारी स्वरुपात शरद आहेर हे सांभाळत आहेत. बग्गा यांच्या रुपाने दमदार आणि उत्साही व्यक्तीमत्व लाभणार आहे. परिणामी, आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाला त्याचा फायदा होणार आहे.