इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बंडखोर आणि अपक्ष उमेदवार सर्वात मोठी भूमिका बजावू शकतात. दोन प्रमुख राजकीय आघाड्या महाविकास आघाडी महायुती युती या बंडखोरांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करीत आहेत. आघाडी किंवा युतीपैकी कुणीही बहुमतापर्यंत पोहोचले नाही, तर १४५ हा जादुई आकडा गाठण्यासाठी बंडखोर आणि अपक्षांना खेचण्याची स्पर्धा लागली आहे.
नवीन सरकार कोण बनवते, हे पाहून प्रत्येक प्रमुख आणि तडजोडीत आपल्या वाट्याला कोण अधिक चांगले देते याचा विचार करून बंडखोर आणि अपक्ष आपली भूमिका ठरवतील; परंतु तरीही अगोदर संपर्क करून त्यांना आपलेसे करण्याच्या प्रयत्नांना गती देण्यात आली आहे. महाविकास आघाडीचा आता या बंडखोरांसोबत संपर्क सुरू असल्याचे समोर आले आहे. राज्यात निवडणुकीसाठी सहा प्रमुख पक्ष रिंगणात होते. २८८ पैकी किमान एक तृतियांश मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. त्यापैकी किमान ५० प्रमुख बंडखोर आहेत, जे सत्ताधारी आणि दोन्ही पक्षांच्या अधिकृत उमेदवारांच्या विजयाला धक्का पोहोचवू शकतात. बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटील यांच्या माध्यमातून जे बंडखोर विजयी होऊ शकतात, अशा उमेदवारांशी फोनवरून संपर्क सुरू करण्यात आला आहे. महाविकास आघाडीकडून निकालाधीच बंडखोरांशी संपर्क सुरू आहे. यामुळे आता निकाल लागताच मोठ्या हालचाली घडण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत.
दरम्यान, याबाबत शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले, “मला पूर्ण खात्री आहे की राज्यात महायुतीचीच सत्ता येईल. कोणत्याही निवडणुकीनंतर राज्यात २० ते ३० अपक्ष आमदार असतातच. या अपक्षांपैकी बहुसंख्य नेते हे वेगवेगळ्या पक्षांमधील बंडखोर असतात. कोणलाही बहुमत मिळाले नाही, तर अपक्षांची गरज भासते. कोणताही पक्ष बहुमताच्या जवळ गेल्यावर अपक्ष आमदार त्या पक्षाच्या बाजूने आपला कल झुकवतात. ते आमदार तातडीने बहुमताजवळ पोहोचलेल्या पक्षाशी किंवा आघाडीशी संलग्न होतात. मला खात्री आहे, की राज्यात महायुतीचे बहुमताचे सरकार येईल; परंतु सत्तास्थापनेसाठी दोन-चार आमदारांची गरज पडली तर अपक्ष आमदार आम्हाला सहकार्य करतील. आम्ही अपक्ष आमदारांचे सहकार्य घेऊन सत्तास्थापन करू.’’