अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पत्रकार चौक ते एसपीओ चौकादरम्यान रोडचे काँक्रीटीकरण,शिंगणापुर फाटा ते राहुरी दरम्यान रोड दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. या मार्गावरुन अवजड वाहतुक मोठया प्रमाणात होत असते. या अवजड वाहनांचा दिंडीतील भाविकांना धक्का लागुन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिंडीमधील वारकऱ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम ३३ (१) (ब) नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करत अहमदनगर-मनमाड या महामार्गावरील विळद बायपास ते पुणतांबा फाटापर्यंतची अवजड वाहतुक २१ जुलै, 2024 पर्यंत पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश पारित केले आहेत.
अहमदनगरकडून मनमाडकडे जाणारी जड वाहतुक विळद बायपास-शेंडी बायपास-नेवासा-कायगाव-गंगापुर -वैजापुर-येवलामार्गे- मनमाडकडे किंवा केडगाव बायपास-कल्याण बायपास-आळेफाटा-संगमनेरमार्गे नाशिककडे जाईल. शनिशिंगणापुर-सोनई वरुन राहुरीमार्गे मनमाडकडे जाणारी जड वाहने अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरुन इच्छित स्थळी जातील.देहरे-राहुरी कृषी विद्यापीठ, राहुरीकडून मनमाडकडे जाणारे जड वाहने श्रीरामपुर-बाभळेश्वर-निर्मळ पिंपरी बायपासमार्गे कोपरगाव-येवला-मनमाडकडे जातील.
मनमाडकडून अहमदनगरकडे येणारे जड वाहने पुणतांबा फाटा-वैजापुर-गंगापुर-कायगाव-नेवासा-शेंडी बायपास-विळद बायपास-केडगाव बायपास मार्गे जातील.लोणी-बाभळेश्वरकडुन अहमदनगरकडे येणारी जड वाहने बाभळेश्वर-श्रीरामपुर-टाकळीभान-नेवासामार्गे अहमदनगरकडे येतील. मनमाडकडुन अहमदनगरमार्गे पुणे-मुंबई-कल्याणकडे जाणारी जड वाहने पुणतांबा फाटा-झंगडे फाटा-सिन्नर-नांदुर शिंगोटे-संगमनेर-आळेफाटामार्गे जातील.
हा आदेश शासकीय वाहने, रुग्णवाहिका,फायर ब्रिगेड, दिंडीमध्ये सहभागी असलेली वाहने व स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक कारणास्तव परवानगी दिलेल्या वाहनांना लागु राहणार नसल्याचेही आदेशामध्ये नमूद केले आहे.