मुंबई – टी-ट्वेंटी विश्वचषकात भारतीय संघाला आधी पाकिस्तान आणि नंतर न्यूझीलंडकडून मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागला आहे. रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. रोहित शर्मा, के. एल. राहुल, कर्णधार विराट कोहली नावाला साजेशी कामगिरी करू शकले नाही. उरलीसुरली कसर भारतीय गोलंदाजांनी पूर्ण केली. या सामन्यावर भारतीय खेळाडूंनी वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्नच केला नसल्याचे दिसून आले. अशा प्रकारे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध कधीही विजय न मिळविल्याचा विक्रम भारतीय खेळाडूंनी कायम राखला आहे. या परभवानंतर भारतीय संघाचे उपांत्यफेरीत प्रवेश करण्याचे दरवाजे जवळपास बंद झाले आहेत. भारताच्या पराभवामागे कोणती कारणे असू शकतात हे आपण जाणून घेऊयात.
नाणेफेक
दुबईमधील आंतरराष्ट्रीय स्टेडिअमच्या मागील सामन्यांवर लक्ष टाकले असता नाणेफेक जिंकणे खूपच महत्त्वाचे मानले जाते. येथे मिळविला जाणारा विजय निम्म्याहून अधिक नाणेफेकीवर अवलंबून असतो. पाकिस्तानप्रमाणे न्यूझीलंडविरुद्ध सुद्धा विराट कोहलीला नाणेफीत नशिबाने साथ दिली नाही. आधीचा इतिहास पाहता केन विलियम्सनने क्षणार्धात गोलंदाजीचा निर्णय घेतला. धावांचा पाठलाग करताना गेल्या टी-ट्वेंटी सामन्यांमध्ये १६ पैकी हा १५ वा विजय ठरला. भारताने नाणेफेक जिंकली असती तर भारताने निम्मा सामना तेव्हाच जिंकला असता.
फलंदाजीचा क्रम
कर्णधार विराट कोहली याने या सामन्यात फलंदाजीचा क्रम बदलल्याने सर्वांना आश्चर्यचकित केले. सलामीला ईशान किशन आणि के एल राहुलला पाठवले. तर रोहित शर्माला तिसर्या क्रमांकावर खेळवले. ईशान-राहुल अपेक्षेप्रमाणे खेळू शकले नाहीत. २.५ षटकात या जोडीने फक्त ११ धावा केल्या. रोहित शर्मा तिसर्या क्रमांकावर विशेष कामगिरी करू शकला नाही. तोसुद्धा १४ धावा करून तंबूत परतला. चौथ्या क्रमांकावर येऊन विराटची बॅट तळपली नाही. भारतीय संघाला फलंदाजीच्या क्रमात बदल करण्याचा फायदा झालाच नाही.
सलामीचे फलंदाज ढेपाळले
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात निराशाजनक कामगिरी करणार्या सलामीच्या फलंदाजांनी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातही तोच कित्ता गिरवला. ईशान किशन याने मिळालेली संधी दवडली. तो ८ चेंडूंचा सामना करून फक्त ४ धावा काढू शकला. सराव सामन्यात गोलंदाजांची धुलाई करणार्या राहुलचा फ्लॉप शो दुसर्या सामन्यातही कायम राहिला. रोहित शर्मला पहिल्याच चेंडूवर जीवदान मिळाले होते. पण तरीही १४ धावा काढून तंबूत परतला. कर्णधार विराट कोहली याने १७ चेंडूत फक्त ९ धावा केल्या.
सूर्यकुमारला वगळण्याचा निर्णय
न्यूझीलंडविरुद्धच्या या मोठ्या सामन्यात कर्णधार विराट कोहली याने चांगली कामगिरी करू न शकणार्या सूर्यकुमार यादव याला संघातून वगळले. त्याच्याऐवजी ईशान किशनला संघात स्थान दिले. ईशान किशन फ्लॉप ठरलाच, शिवाय मधल्या फळीत सूर्यकुमार यादवची कमतरता संघाला भासली. सूर्यकुमारला वगळून ईशानला संघात स्थान देण्याचा निर्णय कोणाच्याच गळी उतरला नाही. हा निर्णय विराटच्या अंगलट आला.
हार्दिकला खेळवण्याचा हट्ट
आपला फॉर्म गमावलेल्या हार्दिक पंड्याला विराटने न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरवले. धावा करताना हार्दिकला चांगलाच संघर्ष करावा लागला. त्याने २४ चेंडूत २३ धावा केल्या. विशेष म्हणजे या स्टार परफॉर्मरने सामन्यात फक्त एकच चौकार लगावला. शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी धुलाई करण्याची भारतीय चाहत्यांची आशा हार्दिक पूर्ण करू शकला नाही. ट्रेंट बोल्डच्या चेंडूवर हार्दिकने मारलेला फटका मार्टिन गप्टिल याने आरामात झेलला.