मुंबई – येथील वानखेडे मैदानावर सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात मोठीच कमाल झाली आहे. काल पहिल्या दिवशी सामन्यामध्ये पावसामुळे मोठा व्यत्यय आला. परिणामी, पहिले सत्र खेळवता आले नव्हते. त्यानंतर दुसऱ्या सत्रात भारताने फलंदाजी सुरू केली. दिवसाअखेर भारताने ४ बाद २२१ धावा केल्या. आज पुन्हा भारतीय संघ मैदानात उतरला. कालच्या ४ बाद २२१ वरुन भारताने खेळ सुरू केला. मयांक अग्रवालने काल शानदार शतक झळकावले. आज त्याने ५० धावांची भर घातली. तो १५० धावा धावांवर बाद झाला. त्यानंतर एकापाठोपाठ एक भारतीय फलंदाज बाद होत गेले. विशेष म्हणजे न्यूझीलंडच्या एजाज पटेल या गोलंदाजाने मोठी कमाल केली आहे. त्याने संपूर्ण भारतीय संघ बाद केला आहे. भारतीय संघ ३२५ धावांवर बाद झाला आहे. एजाज पटेलने १० विकेट घेतले आहेत. त्याने मोठाच विक्रम केला आहे. कसोटी सामन्यात एकाच डावामध्ये दहाच्या दहा बळी घेणाऱ्यांमध्ये एजाज पटेलची नोंद झाली आहे. त्यामुळे तो जगातील तिसरा आणि न्यूझीलंडचा पहिला गोलंदाज ठरला आहे.