चेन्नई – भारताने दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात इंग्लंडवर ३१७ धावांनी दणदणीत विजय मिळविला आहे. विजयासाठी ४८२ धावांचे लक्ष्य गाठताना इंग्लंडची चांगलीच दमछाक झाली. इंग्लंड संघ केवळ १६४ धावाच करु शकला. अक्षर पटेलने सर्वाधिक ५, आर अश्विनने ३ आणि कुलदीप यादवने २ गडी टिपले. आर अश्विनच्या अष्टपैलू खेळामुळे भारताला यश मिळाले आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकला होता. आता दुसरा सामना भारताने जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे.
इंग्लंडचा दुसरा डाव सुरू झाला खरा पण त्यांचे फलंदाज मैदानावर टिकू शकले नाहीत. मोईन अलीने सर्वाधिक ४३ धावा केल्या. सहा खेळाडूंना तर दोन अंकी धावसंख्याही करता आली नाही. इंग्लंडने चौथ्या दिवसाचा खेळ सुरु केला खरा पण त्यांचे फलंदाज पटापट बाद होत गेले. अखेर इंग्लंड संघाला केवळ १६४ धावाच करता आल्या.
दुसऱ्या डावात भारताच्यावतीने आर अश्विनने तडाखेबंद १०६ धावांची खेळी केली. त्यापाठोपाठ कर्णधार विराट कोहलीने ६२ आणि रोहित शर्माने २६ धावा केल्या. अन्य फलंदाज मात्र चमक दाखवू शकले नाहीत. अश्विनच्या फटक्यांमुळेच भारताला २८६ धावांचा पल्ला गाठता आला. परिणामी, भारताने एकूण ४८१ धावांची आघाडी घेतली आहे. इंग्लंडच्यावतीने जॅक लीच आणि मोईन अली यांनी प्रत्येकी ४ गडी बाद केले. तर अली स्टोनने एक गडी टिपला.
दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा संपूर्ण संघ अवघ्या १३४ धावांमध्ये गारद झाला. आर अश्विनच्या भेदक गोलंदाजीमुळे इंग्लंड संघाची पडझड झाली.
भारताने इंग्लंड विरुद्ध आपल्या पहिल्या डावात ३२९ धावा केल्या. सलामीवीर रोहित शर्माची दीडशतकी खेळी, अजिंक्य रहाणेच्या ६७ आणि ऋषभ पंतच्या नाबाद ५८ धावांच्या जोरावर भारताला हा टप्पा गाठता आला आहे.
दुसऱ्या डावात भारतीय संघ किती धावा करुन इंग्लंडपुढे मोठे आव्हान निर्माण करतो त्यावरच हा सामना कोण जिंकणार हे ठरणार आहे.
—
धावफलक असा
भारत – पहिला डाव – ३२९
इंग्लंड – पहिला डाव – १३४
भारत – दुसरा डाव – २८६
इंग्लंड – दुसरा डाव – १६४
https://twitter.com/BCCI/status/1361575900559540233