चेन्नई – भारतीय फलंदाज ढेपाळल्याने पहिल्या कसोटीत इंग्लंडचा विजय झाला आहे. विजयासाठी भारताला ४२० धावा हव्या होत्या. पण, भारतीय संघ मैदानावर फार काळ तग धरु न शकल्याने अखेर २२७ धावांनी भारताचा पराभव झाला आहे. त्यामुळे इंग्लंडने कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
भारत आणि इंग्लंडदरम्यान चेपक स्टेडिअमध्ये सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी भारत सकाळपासूनच पराभवाच्या छायेत होता. इंग्लंडकडून मिळालेले ४२० धावांचं लक्ष्य घेऊन उतरलेल्या भारतीय फलंदाजांची घसरगुंडी उडाली. इंग्लंडच्या जेम्स अँडरसननं उत्तम गोलंदाजी केली.
पाचव्या दिवशीचा खेळ सुरू होताच भारताचा सलामीचा फलंदाज रोहित शर्मा १२ धावा काढून झटपट बाद झाला. शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा डाव सांभाळतील अशी आशा असतानाच पुजारा भारताच्या ५८ धावा असताना बाद झाला. त्यानंतर भारतीय फलंदाज ठराविक अंतरात मैदानावर हजेरी लावत तंबूत परतले. शुभमन गिल खेळपट्टीवर टिकेल असे वाटत असतानाच तो वैयक्तिक ५० धावा काढून बाद झाला. अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर लवकर बाद झाले. लंचपर्यंत भारताचे ६ गडी बाद १४४ धावा झाल्या होत्या. कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक ७२ धावा केल्या. त्याला मात्र अन्य खेळाडूची भक्कम साथ मिळाली नाही. शुभमन गिलने ५० धावा केल्या.
इंग्लंडच्यावतीने जॅक लीचने सर्वाधिक ४, जेम्स अँडरसनने ३, बेर स्ट्रोक्स, आर्चर आणि बाईसने प्रत्येकी १ खेळाडू बाद केला.
मालिकेतला दुसरा सामन्या येत्या १३ फेब्रुवारीपासून चेन्नई इथंच खेळवला जाणार आहे. या सामन्यात स्टेडियमधे ५० टक्के क्षमतेसह प्रेक्षकांना उपस्थित राहता येणार आहे.
धावफलक असा
इंग्लंड – पहिला डाव – ५७८/१०
भारत – पहिला डाव – ३३७/१०
इंग्लंड – दुसरा डाव – १७८/१०