सिडनी – दुसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाने आॕस्ट्रेलियाचा ६ गडी राखून पराभव करतांना सामना आणि मालिकाही जिंकली. भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सामन्यांची मालिका २-१ फरकाने पराभूत झाला होता. हे पराभवाचं शल्य दौ-याच्या सुरुवातीलाच टोचल्याने चाहते काहीसे नाराज झाले होते. परंतु आता या दोन्ही संघात सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतले पहिले दोन्ही सामने जिंकून भारतीय संघाने मालिका विजय संपादन करुन वन-डेतल्या पराभवाचा वचपा काढला आहे.
आजच्या सामन्याचा हिरो ठरला तो हार्दीक पांड्या. हार्दीकने आॕस्ट्रेलियात पाऊल ठेवल्यापासून जणू काही वादळ पिल्यागत धावा करायचं ठरवलं आहे. हा सामना कठीण होता. विजयासाठी टारगेट मोठे होते. परंतु, शिखर धवन, विराट कोहली आणि के.एल. राहूल यांनी फलंदाजी करतांना सेट करुन ठेवलेल्या विजयावर खरा कळस चढवला तो २२ चेंडूत ४२ धावा करणाऱ्या हार्दीकने. अप्रतिम फंलदाजीचे प्रदर्शन करुन त्याने हा सामना जणू काही आॕस्ट्रेलियन संघाच्या जबड्यातून हिसकावून आणला.
आॕस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करतांना २० षटकात ५ बाद १९४ धावा केल्या होत्या. टी२० सामन्यात हे मोठे टारगेट मानले जाते. पहील्या दोन वन-डे सामन्यात आॕस्ट्रेलियाने अशीच मोठी धावसंख्या उभारुन भारताविरुध्द दोन्ही सामने जिंकले होते. पंरतु, आय.पी.एल. खेळून आलेल्या भारतीय संघातल्या जवळ जवळ सर्वच खेळाडूंनी या टारगेटचे फारसे टेन्शन न घेता निडरपणे फलंदाजी केल्याने हा सामना भारतीय संघाला जिंकता आला.
आॕस्ट्रेलियाच्या डावात कर्णधार मॕथ्यू वेड, स्टिव्हन स्मिथ, मॕक्सवेल आणि स्टाॕयनीस यांनी भारतीय गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. एकट्या नटराजनचा अपवाद सोडला तर भारतीय संघाची गोलंदाजी आणि क्षेञरक्षण हे दोन्ही गचाळ झाले होते.