पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत संपली असली तरी दंडाची रक्कम भरुन हा रिटर्न्स भरता येणार आहे. १००० रुपये दंड भरुन आयटीआर दाखल करता येणार आहे. त्यामुळे पुढील कारवाई टाळता येईल. अन्यथा पुढे वाढत जाणारी दंडाची रक्कम, त्यावरील व्याज याचा मनःस्ताप सहन करावा लागू शकतो. त्यामुळे आताच दंडाची रक्कम भरून तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरणे फायद्याचे आहे.
२०२२ – २३ या मूल्यांकन वर्षाकरीता ५ कोटी ८८ हजार ९६२ करदात्यांनी प्राप्तिकर रिटर्न जमा केला आहे. ३१ जुलै या अंतिम तारखेला रात्री ११ वाजेपर्यंत ६७ लाख ९७ हजार ०६७ रिटर्न फाईल करण्यात आले. रात्री १० ते ११ च्या दरम्यान केवळ एका तासात ४ लाख ५० हजार ०१३ रिटर्न भरले गेले. आयकर कायद्याच्या कलम २३४ F नुसार रिटर्न भरण्याच्या शेवटच्या तारखेनंतर आयटीआर भरल्यावर दंड म्हणून ५ हजार रुपये भरावे लागतील.
मात्र, त्या व्यक्तीचे एकूण उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा अधिक नसल्यास केवळ १००० रुपये दंड आकारून हे काम पूर्ण होऊ शकते. त्याचबरोबर जर एखाद्या व्यक्तीचे एकूण उत्पन्न त्याने निवडलेल्या करप्रणालीअंतर्गत त्याचे उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त नसेल तर आयटीआर भरताना त्याला दंडातून सूट देण्यात येईल. ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न भरला नाहीतर दंडाची रक्कम दुप्पट होणार आहे.
आतापर्यंत दाखल झालेल्या आयटीआरपैकी ३ कोटीहून अधिक आयटीआर आयकर रिटर्न म्हणून व्हेरिफाय करण्यात येतील. परतावा विना व्यत्यय त्वरीत मिळण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची आहे. मोबाइल क्रमांक आणि पॅन क्रमांक आधारशी लिंक असेल तर आधार आधारित वन टाइम पासवर्ड वापरून हे काम पूर्ण करता येईल.
Income Tax Return Filing 1 Thousand Penalty