३१ जुलैच्या आतच दाखल करा आयकर विवरणपत्र
नाहीतर भरावा लागेल दंड
आयकर विवरणपत्र (आयटी रिटर्न) दाखल करण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम मुदत आहे. म्हणजेच अवघे ३ दिवसच आता शिल्लक राहिले आहेत. या ३ दिवसात जर तुम्ही रिटर्न भरला नाही तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. आता आपण याविषयीच सविस्तर जाणून घेऊया…
ज्या करदात्यांच्या खात्यांचे ऑडिट करण्याची आवश्यकता नाही अशा करदात्यांची आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी आयकर विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२३ आहे. जर तुम्ही अजूनही रिटर्न दाखल केले नसेल तर, शेवटच्या तारखेची वाट पाहणे किंवा मुदत वाढ मिळेल यावर विसंबुन रहाणे चुकीचे ठरू शकते. त्यामुळे आजच हे काम पूर्ण करा. अन्यथा मुदती नंतर रिटर्न फाईल केल्यास तुम्हाला १००० ते ५००० पर्यंत दंड भरावा लागू शकतो हा तुमच्या उत्पन्नानुसार निर्धारित होत असतो. हि दंडात्मक कारवाई टाळण्याकरिता आजच आपल्या कर सल्लागार यांच्याशी संपर्क करून तुमचे आयकर विवरणपत्र दाखल करा.
आयकर विवरणपत्र भरणाऱ्या करदात्यांपैकी प्रत्यक्षात केवळ 30% करदात्यांकडून कर भरणा होत आहे. कर संकलनात वाढ व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत आयकर विवरणपत्र दाखल करणाऱ्या करदात्याच्या संख्येत वाढ होत असली तरी प्रत्यक्षात कर संकलनात तेवढी वाढ होताना दिसत नाही. आयकर विवरणपत्र दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या करदात्यांना केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने नोटिसा बजावल्या आहेत. यात आयकर विविरणपत्र दाखल न करणारे, उत्पन्न चुकीचे किंवा कमी दाखवणारे अशा करदात्यांचा समावेश आहे.
आयकर विवरणपत्र भरताना सावधगिरी बाळगावी
कर चोरीला लगाम लागावा यासाठी आयकर विभाग कडून विविध तंत्रज्ञान/यंत्रांना कार्यान्वित करण्यात येत आहे त्यानुसार विविध स्रोतच्या माध्यमातून तुमच्या आर्थिक व्यवहारांची माहिती प्राप्तिकर कार्यालयाकडे उपलब्ध होत असते. आयकर संकेतस्थळावर एआयएस व २६ एएस मधून तुमच्या व्यवहाराची माहिती उपलब्ध करून दिली जाते त्यामुळे विवरणपत्र भरताना सावधगिरी बाळगावी. कराचे अचूक मूल्यमापन करण्यासाठी सर्व व्यवहारांची माहिती द्यावी जेणेकरून भविष्यातील नोटिसांपासून तुम्ही निश्चित राहतात.