मुंबई – करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. प्राप्तीकर विभागाने दोन चांगल्या गोष्टी केल्या आहेत. एक म्हणजे प्राप्तीकर परताव्याची रक्कम करदात्याच्या खात्यामध्ये थेट जमा केली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे प्राप्तीकर विभागाने आपल्या पोर्टलवर २०१९-२० आणि २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी लेखापरीक्षण उपयोगिता अर्ज अपलोड केला आहे. प्राप्तीकर परताव्याची रक्कम मिळाली आहे की नाही हे तुम्ही तपासून पाहू शकतात.
सीबीडीटीच्या माहितीनुसार, १ एप्रिल २०२१ पासून २५ ऑक्टोबर २०२१ दरम्यान ७७.९२ टक्के करदात्यांच्या खात्यात १,०२,९५२ कोटी रुपयांचा परतावा जमा केला आहे. तुमचा परतावा मिळणे बाकी असेल तर तुम्हीही तपासू शकतात. सीबीडीटीच्या माहितीनुसार, ७६,२१,९५६ प्रकरणांमध्ये २७,९६५ कोटी रुपयांचा प्राप्तीकराचा परतावा जमा करण्यात आला आहे. तर १,७०,४२४ प्रकरणांमध्ये ७४,९८७ कोटी रुपयांचा व्यावसायिक कराचा परतावा जमा करण्यात आला आहे.
२०२०-२१ या व्यापार वर्षात (आकलन वर्ष २०२१-२२) विक्री, उलाढाल किंवा एकूण मिळकत दहा कोटी रुपयांपेक्षा अधिक असेल, तर प्राप्तीकर कायद्यांतर्गत करदात्यांनी आपल्या खात्याचे लेखापरीक्षण करणे अनिवार्य आहे. व्यावसायिकांच्या प्रकरणांमध्ये याची मर्यादा ५० लाख रुपये आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात ही मर्यादा प्रत्येकी ५ कोटी रुपये आणि ५० लाख रुपये आहे.
२०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी कर लेखापरीक्षण अहवाल दाखल करण्याची अखेरची मुदत १५ जानेवारी २०२२ आहे. २०१९-२० आर्थिक वर्षासाठी १५ जानेवारी २०२१ पर्यंत अहवाल दाखल करायचा होता. कंपन्या अजूनही संशोधित कर लेखापरीक्षण अहवाल दाखल करू शकतात.