इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आयकर विभागाच्या वतीने देशभरातील अनेक कंपन्यांवर सध्या छापे टाकण्यात येत आहेत. देशातील सर्वात मोठी रिअल इस्टेट कंपनी ओमॅक्स ग्रुपच्या 45 ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. सलग दोन दिवस सुरू असलेल्या या छापेसत्रात आतापर्यंत सुमारे 20 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. दिल्ली, चंदीगड आणि लखनौ येथील कार्यालये आणि इतर ठिकाणांवप हे छापे चाकण्यात आले. यामध्ये दिल्लीतून सर्वाधिक 12.50 कोटी रुपयांच्या जप्तीचा समावेश आहे.
विशेष म्हणजे यात त्याचबरोबर 200 कोटी रुपयांच्या व्यवहारांची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. बिल्डरने फ्लॅटच्या एकूण रकमेपैकी 30 ते 40 टक्के रक्कम करचुकवेगिरीसाठी रोख स्वरूपात घेतल्याचा आरोप आहे. आयकर विभाग, चंदीगडच्या या कारवाईत सर्व शहरातील 250 अधिकारी सामील आहेत.
दिल्लीत 20 ठिकाणी तपास सुरू आहे. यामध्ये नोएडाच्या आयकर विभागाचे पथक दिल्लीतील कालकाजी येथे असलेल्या बिल्डरच्या मुख्य कार्यालयासह तीन ठिकाणी तपास करत आहेत. विविध ठिकाणांहून जप्त करण्यात आलेल्या रोकड मोजण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. दिल्ली आयकर विभागाची टीम नोएडामधील सेक्टर 62, 93बी आणि ग्रेटर नोएडा येथील जेपी ग्रीन सोसायटीमध्ये तपास करत आहे. येथून एक कोटी रुपये मिळाले आहेत. तसेच काही कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीपर्यंत सुमारे दहा ठिकाणी तपास थांबण्याची शक्यता होती, तर उर्वरित ठिकाणी कारवाई सुरूच राहणार आहे. सोमवारी सकाळी सात वाजता प्राप्तिकर विभागाची कारवाई सुरू झाली.
यामध्ये दिल्ली-एनसीआरमध्ये 34 ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. देशातील हा तपास चंदीगड येथील आयकर विभागाचे अतिरिक्त संचालक अंकुर आलिया यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. त्याच वेळी, दिल्ली एनसीआरमध्ये, हा तपास सहसंचालक अश्विन यांच्या देखरेखीखाली उपसंचालक ज्योतिंदर बाजवा करत आहेत.