इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आयकर विभागाने झाशीमध्ये उद्योगपती, बिल्डर व व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानांवर सलग पाच दिवस छापेमारी करत मोठी कारवाई केली आहे. या छापेमारीत तब्बल ६०० कोटींची बेहिशेबी मालमत्ता समोर आली असून आयकर विभागाला मोठे यश मिळाले आहे.
आयकर विभागाने केलेल्या कारवाईदरम्यान अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. यामध्ये ६०० कोटींपेक्षा अधिक बेनामी मालमत्ता, रोख रक्कम, सोने व करचोरी पकडली आहे. चौकशी दरम्यान हे उद्योगपती, बिल्डर व व्यापाऱ्यांच्या डायऱ्या पाहून इन्कम टॅक्सचे अधिकारे चक्रावले आहेत. या डायरीत कोट्यावधींच्या बेहिशेबी व्यवहारांची नोंद झाली आहे. यासह २०० कोटींची बनावट बिलं दाखवून २०० कोटींच्या रोकडच देवाण घेवाण झाल्याचेही तपासात समोर आले आहे.
या संपूर्ण कारवाईत आयकर पथकाने उद्योगपती, बांधकाम व्यावसायिक, रिअल इस्टेट व्यावसायिक आणि घनराम ग्रुपकडून सुमारे दीड कोटींपेक्षा अधिक बेहिशेबी रोख रक्कम जप्त केली आहे. याशिवाय प्रत्येकाने सुमारे दीड कोटी रुपयांची करचोरी केल्याची कबुली दिली असल्याचे देखील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
प्राप्तिकर पथकाने सर्व व्यावसायिक, बिल्डर व व्यापाऱ्यांकडून एक डायरी जप्त केली असून या डायरीत ३०० कोटी रुपयांचा रोख व्यवहार आढळून आला आहे. या धाडसत्रादरम्यान ९ किलो सोन्याचे दागिनेही आयकर पथकाच्या हाती लागले आहेत. याशिवाय आयकर पथकाने या सर्व व्यावसायिक, व्यापारी आणि बांधकाम व्यावसायिकांमधील सर्वात महत्त्वाचा दुवा सीए दिनेश सेठी यांच्या निवासस्थानावर देखील धाड टाकली.
या सीएच्या घरातील कपाटात ठेवलेल्या बिल्डर, व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांशी संबंधित कागदपत्रे पथकाने जप्त केली आहेत. घरावर छापा पडला तेव्हा सीए सेठी घरात नव्हते. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना बाहेरच गाठून त्यांची वॉरंटवर सही घेतली. घनाराम ग्रुपच्या मालकाला नोएडा येथील कंपनीच्या मुख्य कार्यालयात ४ दिवस नजरकैदेत ठेवल्याचा दावाही आयकर पथकाने केला आहे. ही धाड टाकण्यापूर्वी ६ महिन्यांपासून अधिकारी नजर ठेवून होते.
आयकर विभागाने कोट्यवधी रुपयांची करचोरी, बेनामी मालमत्ता, बेहिशेबी रोकड, सोने असल्याची पुष्टी केल्यानंतर गृह मंत्रालयाच्या परवानगीने ही छापेमारी करण्यात आली. या व्यापाऱ्यांचे फोनदेखील टॅप करण्यात आले होते. या सर्व लोकांना आलेले फोन कॉल्स स्वत:च्या सर्विलान्सवर घेत त्यांच्यात झालेली चर्चा आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऐकली. त्याबरोबरच पाच दिवसांच्या छापेमारी कारवाईत आयकर पथकाने खासगी बँकांमधील चौदा लॉकर्सची झडती घेतली असून हे लॉकर्सही सील देखील केले आहेत.
Income Tax Raid Consecutive 5 day got Money