नवी दिल्ली – पान मसाला समुहाशी संबंधित छाप्यांच्या साखळीत गुरुवारी एका मोठ्या अत्तर व्यावसायिकाच्या सात ठिकाणांवर वस्तू आणि सेवाकर गुप्तचर संचालनालयाच्या (डीजीजीआय) पथकाने छापे मारले. या छापेमारीत जवळपास १५० कोटी अघोषित रकमेचा खुलासा झाला असून, ९० कोटी रुपये रोख सापडले आहेत.
या कारवाईत अत्तर व्यावसायिक पीयूष जैन यांच्या कन्नौज येथील एक घराला सील करण्यात आले आहे. कानपूरमध्ये नोटा मोजण्याचे मशीन मागविण्यात आले. मध्यरात्री उशिरापर्यंत पथकाने झडती घेतली. जैन यांच्या कनौज येथील तीन परिसरांवर, कानपूर येथील घर, कार्यालय, पेट्रोल पंप आणि शीतगृहांवर तपास पथकाने एकदम छापे मारले.
अधिकार्यांनी त्यांच्या मुंबईतील शोरूम आणि कार्यालयातही कारवाई केली आहे. त्यांच्यासह एका वाहतूक कंपनीच्या घर आणि कार्यालयावरही छापे मारण्यात आले. या वाहतूक कंपनीचा मोठा व्यवसाय आहे. त्यांची पान मसाल्याच्या कंपनीशी थेट लिंक आहे. ट्रान्सपोर्ट नगर आणि आनंदपुरी येथे मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जप्त करण्यात आले आहेत.
सकाळी साडेदहा वाजता डीजीजीआयच्या मुंबई आणि गुजरात विभागाने छापेमारी सुरू केली. या छापेमारीदरम्यान मोठ्या प्रमाणात बनावट कंपन्यांच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करण्याचे प्रकरण पकडण्यात आले आहे. कमीत कमी ४० बोगस कंपन्या पकडण्यात आल्या आहेत. बनावट कंपन्यांच्या शेअर्सच्या मूळ किमतीला अनेक पटीने वाढवून काळा पैसा पांढरा करण्याचे पुरावे सापडले आहेत.
मशीनद्वारे नोंटांची मोजणी
व्यावसायिकाच्या घरातून मिळालेला पैसे इतक्या मोठ्या प्रमाणात होते, की विभागाला नोटा मोजण्याच्या चार मशीन मागवाव्या लागल्या. या मशिन रात्री उशिरापर्यंत व्यावसायिकाच्या घरातच होत्या. संबंधित व्यावसायिकाच्या आणखी दोन कंपन्या आखाती देशांमध्ये आहेत. देशात सहा कंपन्या नोंदणीकृत आहेत. कानपूरमध्ये घर आणि कन्नौजमध्ये अत्तराचा व्यवसाय असतानाही त्याच्या व्यवसायाचे केंद्र मुंबईतच आहे.