नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वर्षाचा दोन लाख रुपये कमावणारा माणूसही आयकर विभागाचे नाव ऐकले की उगाच घाबरतो, एवढी या विभागाची दहशत आहे. पण याच विभागातील लोक लाचखोरी करत असल्याची घटना पुढे आली आहे. मुख्य म्हणजे दोन आयकर अधिकाऱ्यांनी पैश्याच्या हव्यासापोटी स्वतःचीच फजिती करून घेतली.
दिल्लीतील एक व्यापारी वह्या-पुस्तकांच्या व्यवसायात आहे. त्याच्याशी करार केलेल्या इतरही काही कंपन्या आहेत. तर आयकर विभागाचे दोन अधिकारी मुकेशकुमार आणि अनुपकुमार अचानक व्यापाऱ्याच्या घरी पोहोचले. आपला व्यवहार शुद्ध असताना आणि सारेकाही नियमाने कामकाज सुरू असतानाही काही क्षण व्यापाऱ्याला भिती वाटली. त्यामुळे तो धडपडत घरी पोहोचला. घरी पोहोचल्यावर त्याला एका कंपनीच्या संदर्भात विचारण्यात आले ज्या कंपनीसोबत त्याचा करार आहे.
व्यापाऱ्याने सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. पण तरीही कागदपत्रे तपासायची आहेत म्हणून या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे दोन्ही अधिकारी व्यापाऱ्यासोबत कार्यालयात गेले. तिथे गेल्यावर सगळी कागदपत्रे त्यांनी नीट तपासली. सारेकाही नियमात होते. कुठेही कारवाई करायला स्कोप नव्हता. तरीही संबंधित कंपनीच्या विरोधात जबाब देण्यासाठी दोन्ही अधिकारी व्यापाऱ्यावर दबाव आणू लागले. काहीही हाती लागत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी व्यापाऱ्याला लाच मागितली. नाहीतर अटक करू अशी धमकी दिली.
व्यापारी घाबरल्यामुळे अधिकाऱ्यांची हिंमत वाढली. त्यांनी दहा लाख रुपयांची लाच मागितली. एवढे पैसे शक्य नसल्यामुळे तडजोड करून ५ लाख रुपयांवर सौदा झाला. व्यापाऱ्याने पैसे दिले. पण हे पैसे तर साहेबांचे आहेत, आमच्यासाठी ५० हजार रुपये दे, अशी मागणी अधिकाऱ्यांनी केली. त्याने तेही पैसे अधिकाऱ्यांना दिले. अधिकारी निघून गेल्यावर व्यापाऱ्याने सीबीआयकडे तक्रार केली. सीबीआयने दोन्ही अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
पुरावा दमदार
दोन्ही अधिकारी घरी होते तोपर्यंत ठीक होते. पण ज्यावेळी ते कार्यालयात आले, त्यांचे सगळे बोलणे आणि लाच घेण्याचा उपक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. व्यापाऱ्याने पुराव्यादाखल सीसीटीव्ही फुटेज सीबीआयला दिले. त्यामुळे लगेच गुन्हे दाखल करता आले.
अधिकारी बेभान
शंभर रुपयांची लाच घेताना चौकात उभे असलेले पोलीसही आजुबाजुला एकदा बघून घेतात. अशात ५ लाख रुपयांची लाच घेताना अधिकारी इतके बेभान होते की, त्यांनी सीसीटीव्ही सुद्धा बघितले नाही. तक्रार झाली तर सीसीटीव्ही फुटेजचा पुरावा आपल्याला घातक ठरेल, असाही विचार त्यांच्या मनात आला नाही.
income Tax Officer Bribe Corruption