नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – परफ्यूम व्यापाऱ्याच्या घरातून कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले आहेत. करचुकवेगिरी तसेच बेकायदेशीरपणे व्यवसाय करण्यातून ही रक्कम जप्त करण्यात आली असून, आरोपी पीयूष जैन यांच्याविरुद्ध ३३४ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी आणखी पाच जणांविरुद्ध चौकशी सुरू आहे. त्यांच्यावर आरोपपत्रही दाखल होऊ शकते, अशी माहिती डायरेक्टर जनरल ऑफ जीएसटी इंटेलिजन्स अहमदाबादकडून देण्यात आली आहे.
पीयूष जैन यांच्याकडून एकूण १९६ कोटी ५७ लाख २ हजार ५३९ रुपये जप्त करण्यात आल्याचे जीएसटीचे विशेष सरकारी वकील अंबरिश टंडन यांनी सांगितले. त्यापैकी कानपूरमधील आनंदपुरीतील घरातून १७७ कोटी ४५ लाख १ हजार २४० रुपये, कन्नौजमधील घरातून १९ कोटी ३ लाख १ हजार २८९ रुपये आणि पीयूषच्या कन्नौजमधील बँक लॉकरमधून ९ लाख १० रुपये जप्त करण्यात आले आहेत. आरोपपत्रात १६ साक्षीदारांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये एसबीआय कानपूरच्या मुख्य शाखेचे व्यवस्थापक, एसबीआय कन्नौजच्या सराईमिरा शाखेचे व्यवस्थापक आणि डीजीजीआय टीमच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. डीजीजीआय अहमदाबाद युनिटचे एडीजी विवेक प्रसाद यांच्या परवानगीनंतर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपाची दखल घेत न्यायालयाने गुन्हा दाखल केला आहे. पियुषचे वकील चिन्मय पाठक यांनी मात्र पियुषवरचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यामुळेच लवकरच जामीन अर्ज न्यायालयात दाखल करणार असल्याचे ते म्हणाले.
न्यायालयाच्या सूचनेनंतर कारागृहात असलेल्या पियुष जैन यांची चार दिवस चौकशी करण्यात आली तसेच जबाब नोंदवण्यात आले. यात जप्त केलेले सर्व पैसे आपलेच असल्याचे पियुषने कबूल केले आहे. तीन-चार वर्षे कोणत्याही प्रकारचा कर न भरता त्यांच्याकडून व्यवसाय सुरू होता. पियुष मेसर्स ओडोसंथ आयएनसी, फ्लोरा नॅचरल्स आणि ओडोकेम इंडस्ट्रीज या तीन कंपन्यांचा मालक आहे. याशिवाय अन्य फर्ममध्येही त्याचा हिस्सा आहे. करचुकवेगिरीप्रकरणी पियुषकडून जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेबाबत न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. रोख रकमेसह त्याच्याकडून २३ किलो सोने आणि चंदनाचे तेलाचे सहा ड्रमही जप्त करण्यात आले आहेत. या संदर्भात महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) आणि कस्टम विभागाचे पथक स्वतंत्रपणे तपास करत आहेत. CGGST कायद्याच्या कलम १३२(१) I अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पियुषवरील आरोप हा अजामीनपात्र गुन्हा आहे. ज्यामध्ये पाच वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद आहे.