मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेशी संबंधित दोन मोठ्या व्यक्तींच्या घरी आयकर विभागाने आज छापेमारी केल्याची बाब समोर आली आहे. त्यात शिर्डी संस्थानचे विश्वस्त राहुल कनाल यांच्या मुंबईतील घरी छापेमारी करण्यात आली आहे. कनाल हे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या खास ओळखीतले आहेत. कनाल यांचे मुंबईतील वांद्रे परिसरात नाईन अल्मेडा या बिल्डींगमध्ये घर आहे. तेथे आयकर विभागाच्या पथकाने आज छापा टाकला. तेथे छापामारी सुरू आहे. या बिल्डींगच्या परिसरात सुरक्षा दलाचे अधिकारी व कर्मचारी यांचा कडक बंदोबस्त आहे. ही छापेमारी नक्की कशाशी संबंधित हे अद्याप स्पष्ट झालेली नाही.
शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय समजले जाणारे संजय कदम यांच्या घरीही आयकर विभागाने छापेमारी केली आहे. कदम हे शिवसेने अंधेरी पश्चिम मतदारसंघाचे संघटक आहेत. ही छापेमारी कुठल्या कारणासाठी करण्यात आली आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, एकाच दिवशी शिवसेनेशी संबंधित दोन व्यक्तींवर छापेमारी झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या दोन्ही छाप्यांबाबत आयकर विभागाकडून लवकरच मोठा खुलासा होण्याची चिन्हे आहेत.