अहमदाबाद – प्राप्तीकर विभागाने 28.09.2021 रोजी रिअल इस्टेट डेव्हलपर ग्रुप आणि या ग्रुपशी संबंधित दलालांवर धाड आणि जप्तीची कारवाई केली. यात एकूण 22 निवासी आणि व्यवसाय ठिकाणांवर कारवाई करण्यात आली.
रिअल इस्टेट डेव्हलपर ग्रुपकडून, मोठ्या प्रमाणावर दोषी असल्याचे सिद्ध करणारी कागदपत्रे, संशयास्पद कागदपत्रे, डिजिटल पुरावे इत्यादी सापडले असून ते जप्त केले आहेत. या पुराव्यांमध्ये ग्रुपने गेल्या अनेक आर्थिक वर्षांमध्ये केलेल्या बेहिशेबी व्यवहाराच्या तपशीलवार नोंदी आहेत. जमिन व्यवहारामध्ये बेहिशेबी 200 कोटी रुपयांपेक्षाही जास्त गुंतवणूक दाखवणारे दस्तऐवज आणि जमिनीच्या विक्रीतून बेहिशेबी 100 कोटी रुपयांच्या रोखीच्या पावत्या सापडल्या असून त्या जप्त करण्यात आल्या आहेत. बेनामी व्यक्तींच्या नावावर वर्षानुवर्षे खरेदी केलेल्या मालमत्तांची मोठ्या संख्येने मूळ कागदपत्रे देखील सापडली आहेत.
दलालामार्फत झालेल्या जमिन खरेदी -विक्रीच्या व्यवहारांशी संबंधित रोख आणि धनादेशामधील देयकाचा तपशील दर्शविणारी कागदपत्रेही सापडली आहेत. आतापर्यंत या जमीन व्यवहारात 230 कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख व्यवहार दाखवणारे दस्तऐवज सापडले आहेत. ते जप्त केले आहेत.
सापडलेल्या कागदपत्रांमधून रिअल इस्टेट समूहाने 200 कोटी रुपयांपेक्षा अधिकचे तर दलालांनी 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक बेहिशेबी उत्पन्न मिळवल्याचे दलालांकडे सापडलेल्या कागदपत्रांमधील नोंदींतून दिसते. एकूणच, धाडसत्र आणि जप्तीच्या कारवाईमुळे 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा बेहिशेबी व्यवहार उघडकीला आला आहे.
धाडसत्र आणि जप्तीच्या कारवाई दरम्यान 24 लॉकर्स देखील सापडले आहेत. ते गोठवले आहेत. आतापर्यंत अंदाजे 1 कोटी रुपयांची रोकड आणि 98 लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. धाडसत्र आणि जप्तीची कारवाई अजूनही सुरू असून पुढील तपास सुरू आहे.