लखनऊ (उत्तर प्रदेश) – अत्तर व्यापारी पीयूष जैन यांच्या कानपूर आणि कन्नौजमधील घर आणि ठिकाणांवर छापेमारी करून १९४ कोटी रुपये रोख आणि २३ किलो सोने हस्तगत केल्यानंतर आता प्राप्तीकर आणि जीएसटी विभागाच्या पथकाने समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय आणि विधान परिषदेतील आमदार पुष्पराज ऊर्फ पम्मी जैन यांच्या ठिकाणावर छापे मारून कारवाई सुरू केली आहे. शुक्रवारी सकाळी पथकांनी पुष्कराज जैन यांच्या कन्नौज, नोए़डा, कानपूर, हाथरस आणि मुंबई येथील ठिकाणांवर छापे मारले.
सकाळी सात वाजेपासून दीडशे अधिकारी वेगवेगळ्या ५० ठिकाणांवर छापे मारत आहेत. छापेमारीत काय सापडले याची माहिती मिळू शकली नाही. करचोरी केल्याच्या आरोपावरून ही छापेमारी करण्यात आल्याचे बोलले जात आहे. पुष्पराज जैन यांच्याशिवाय प्राप्तीकर विभागाच्या पथकाने कन्नौजच्या मोहम्मद याकूब नावाच्या आणखी एका अत्तर व्यापार्याच्या ठिकाणांवरही छापेमारी केली आहे.
यापूर्वी पीयूष जैन यांच्या ठिकाणी केलेल्या छापेमारीला समाजवादी पार्टीशी जोडल्याने पक्षाच्या नेत्यांनी आक्षेप घेतला होता. पीयूष जैन यांच्याशी संबंध नसल्याचे स्पष्टीकरण पुष्पराज जैन यांनी म्हटले होते. कन्नौजमध्ये पुष्पराज आणि पीयूष जैन यांचे घर जवळजवळच आहेत. परंतु दोघांमध्ये ख्याली खुशहाली विचारण्याशिवाय कोणतेच संबंध नव्हते, असे स्पष्टीकरण पुष्पराज जैन यांनी सांगितले. पीयूष जैन यांच्या ठिकाणांवर छापेमारी केल्यापासून समाजवादी पार्टी आणि भाजपदरम्यान आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
"पीयूष जैन पर छापा पड़ा और जब सच्चाई सामने आई तो भारतीय जनता पार्टी खुद बदनाम हो गई"
माननीय राष्ट्रीय अध्यक्ष श्री अखिलेश यादव जी ने कहा: pic.twitter.com/CR9lX4y2uz
— SamajwadiPartyMediaCell (@MediaCellSP) December 31, 2021
हाथरसमध्येही छापा
हाथरसमधील हसायन भागातील सिकतरा रोडवरील अत्तराच्या कारखान्यातही पथकांनी छापा मारला आहे. या कारखान्याचे मालक पुष्पराज जैन आहे. कारखान्यात अनेक पथके छापेमारी करत आहेत. छापेमारीचे वृत्त पसरताच परिसरातील अत्तर व्यापार्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कारखान्याजवळ कोणालाही येऊ दिले जात नाहीये. छाप्यामध्ये कानपूर, आग्रा येथील नंबरचे वाहने दिसून येत आहेत. हा कारखाना अनेक वर्षांपासून बंद होता.
आमदार पुष्पराज जैन यांच्या ठिकाणांवर मुंबईतून इनपुट मिळाल्यानंतर छापेमारी करण्यात आली आहे. बादशाह वाहतूक कंपनीने करचोरी केल्याचा पुरावा मिळाला होता. ही वाहतूक कंपनी मुंबई, कानपूरसह देशातील इतर भागात पसरलेली आहे. जैन यांच्या स्वरूप नगर, सिव्हिल लाइन्स आणि ट्रान्सपोर्ट नगर येथील ठिकाणांवर छापेमारी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.