बंगळुरू – कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे निकटवर्तीय बी. आर. उमेश आणि इतरांच्या बंगळुरू येथील ठिकाणांवर प्राप्तीकर विभागाने मारलेल्या छाप्यात ७५० कोटी रुपये बेनामी संपत्तीचे घबाड हाती लागले आहे. संबंधित कंपन्यांच्या समुहाने त्यापैकी ४८७ कोटी रुपयांची संपत्ती अघोषित संपत्ती असल्याचे मान्य केले आहे. प्राप्तीकर विभागाने ७ ऑक्टोबरपासून तीन दिवस बी. आर. उमेश यांच्यासह सिंचन आणि महामार्ग परियोजनांमधील बंगळुरू येथील तीन मोठ्या ठेकेदारांच्या प्रकरणांमध्ये छापेमारी केली होती.
छाप्यांदरम्यान ४.६९ कोटी रुपयांची अघोषित रोख रक्कम, ८.६७ कोटी अघोषित सोन्या-चांदीचे दागिने आणि २९.८३ लाखांच्या चांदीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या. सिंचन विभागाच्या २० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या विविध परियोजनांकडे या छाप्यांचा रोख होता. यातील पैसा येडियुरप्पांकडे जात होता असा संशय प्राप्तीकर विभागाला आहे, असे सूत्रांनी सांगितले. प्राप्तीकर विभागाच्या दाव्यानुसार, कामगारांचा खर्च म्हणून दाखविण्यात आलेली ३८२ कोटी रुपयांची रक्कम वाढवून सांगितली आहे, असे एका कंपनी समुहाने मान्य केले आहे. निवास व्यवस्थेबाबतच्या अस्तित्वात नसलेल्या गोष्टी दाखविण्यात आल्या असून ही रक्कम १०५ कोटी रुपये आहे, असा दावा दुसर्या एका कंपनी समुहाने केला आहे. अंमलबजावणी संचालनालय या हेराफेरीची चौकशी करण्याची शक्यता आहे.
डिझाइन बॉक्स नावाच्या कंपनीचे कार्यालय आणि कंपनीचे मालक नरेश अरोरा हे राहात असलेल्या हॉटेलच्या खोलीतही प्राप्तीकर विभागाने छापेमारी केली आहे. ही कंपनी बंगळुरूमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे व्यवस्थापन आणि सामर्थ्यशाली राजकीय नेत्यांचे त्यांची ब्रँडिंग करते. ही छापेमारी मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत सुरू होती. ही कंपनी काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांची आहे असे बोलले गेले. परंतु त्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. दरम्यान, ही छापेमारी येडियुरप्पा यांना मात देण्यासाठी तसेत त्यांना काबूत ठेवण्यासाठी मारण्यात आले आहेत, असा आरोप जेडीएसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी केला आहे. येडियुरप्पा आणि विरोधी पक्षनेते सिद्धरमय्या यांनी कर्नाटकमध्ये भाजपला क्षीण करण्याची योजना बनविण्यासाठी म्हैसूर येथे भेट घेतली होती, असा आरोपही त्यांनी केला आहे. येडियुरप्पाचे निकटवर्तीय आणि त्यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांनाच प्राप्तीकर विभागाने का लक्ष्य केले असेल, हे साधारण समज असलेल्या कोणालाही समजू शकते. येडियुरप्पांना रोखण्यासाठी भाजपने ही चाल खेळलेली आहे, असा दावाही कुमारस्वामी यांनी केला आहे.