पुणे – आय़कर विभागाने दौंड शुगर, आंबलिक शुगर, जरंडेश्वर साखर, पुष्पदंतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्याच्या संचालकांवर छापे टाकले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हे सर्व संबधीत आहे. त्याचप्रमाणे अजित पवार यांच्या बहिणीशी संबधीत संस्थेवरही छापे टाकण्यात आले आहे. आज सकाळपासून आयकर विभागाचे हे धाडसत्र सुरु झाले आहे.याअगोदरच राज्यातील ६० हून अधिक सहकारी साखर कारखान्यांना आयकर खात्याने सात हजार कोटी आयकर भरण्यासाठी नोटीस पाठवली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे. पोलिस यंत्रणेला कुठलीही कल्पना न देता सीआरपीएफच्या जवानांची मदत घेऊन ही कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईत अहमदनगर जिल्ह्यातील अंबालिका कारखाना अजित पवारांच्या खाजगी मालकीचा आहे. त्याचबरोबर बारामतीतील डायनॅमिक्स डेअरीवर देखील छापा टाकण्यात आला आहे. एकुणच या सर्व छाप्यामध्ये पवार कुटुंबियांना टार्गेट करण्यात आले आहे.
या छाप्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले इन्कम टॅक्स विभागाने राजकीय हेतूपोटी छापा टाकला का याबाबत तेच सांगू शकतील. माझ्या नातेवाईकांच्या संबंधित कंपन्यांवर धाडी टाकल्या जात आहेत. आता ते अजित पवारांचे नातेवाईक आहेत म्हणून त्यांच्यावर धाडी टाकत आहेत. याचे मला वाईट वाटते. यावेळी त्यांनी माझ्या बहिणींशी संबंधित संस्थांवर धाडी टाकल्या. त्यांचा दुरान्वयेही राजकारणाशी संबंध नाही. ते अजित पवारांचे नातेवाईक आहेत म्हणून त्यांच्यावर धाडी टाकण्यता आल्या. इतक्या खालच्या पातळीवरच राजकारण होत असल्याचेही त्यांनी सांगितले.