इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः प्राप्तिकर विभागाने रविवारी करदात्यांना इशारा दिला, की त्यांनी परदेशात असलेली मालमत्ता किंवा परदेशात कमावलेले उत्पन्न त्यांच्या प्राप्तिकर परताव्यात जाहीर केली नाही, तर त्यांना १० लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
नुकत्याच सुरू झालेल्या अनुपालन-सह-जागरूकता मोहिमेचा एक भाग म्हणून प्राप्तिकर विभागाने ही माहिती दिली. २०२४-२५ च्या मूल्यांकन वर्षासाठी त्यांच्या प्राप्तिकर परताव्यात ही माहिती प्रदान करणे आवश्यक आहे. विभागाने म्हटले आहे, की भारतीय करदात्यांनी कोणत्याही भांडवली मालमत्तेचा अहवाल देणे आवश्यक आहे. परदेशी बँक खाती, रोख मूल्य विमा करार किंवा वार्षिक करार, कोणत्याही संस्था किंवा व्यवसायातील आर्थिक भागीदारी, स्थावर मालमत्ता, ताब्यात खाते, इक्विटी आणि कर्ज व्याज आदींचा तपशील देणे आवश्यक आहे.
प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे, की करदात्यांना त्यांचे उत्पन्न ‘करपात्र मर्यादेपेक्षा कमी’ असले तरीही त्यांच्या प्राप्तिकर परताव्यात विदेशी मालमत्ता, किंवा विदेशी स्रोत उत्पन्न शेड्यूल भरणे सक्तीचे आहे. प्राप्तिकर परताव्यात परकीय मालमत्ता/उत्पन्न उघड न केल्यास काळा पैसा (अघोषित विदेशी उत्पन्न आणि मालमत्ता) आणि कर कायदा, २०१५ अंतर्गत १० लाख रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो, असे म्हटले आहे. कर विभागाची प्रशासकीय संस्था सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (सीबीडीटी) ने सांगितले होते, की या मोहिमेअंतर्गत २०२४-२५ साठी प्राप्तिकर परतावे भरलेल्या करदात्यांना संदेश आणि ईमेल पाठवले जातील. ज्यांची परदेशात मालमत्ता किंवा परकीय उत्पन्न असण्याची शक्यता आहे, अशांना ते पाठवले जातील. प्राप्तिकर परतावे भरण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर आहे.