टीम इंडिया दर्पण
राज्याच्या ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचं प्रमाण अजूनही कमी न झाल्यानं काही जिल्ह्यांमधे स्थानिक प्रशासनानं काही दिवसांचा कठोर लॉकडाऊन लागू केला आहे.
बुलडाणा जिल्ह्यात उद्या रात्री ८ वाजता कडक लॉकडाऊन सुरु होईल. तो २० मे च्या संध्याकाळी ६ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे,जिल्हाधिकारी राममूर्ती यांच्यासह जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.
अकोला जिल्ह्यात आज रात्री १२ वाजल्यापासून १२ मे च्या मध्यरात्रापर्यंत कडक लॉकडाऊन लागू राहणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्री उदय सामंत यांनी ७ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. आज मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी सुरु होईल.
वाशीम, बीड, वर्धा, अमरावती, लातूर, या जिल्ह्यांसह ठाणे जिल्ह्यातल्या कुळगांव बदलापूर नगरपालिका क्षेत्रातही तिथल्या प्रशासनांनी ७ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे.लॉकडाऊनच्या काळात दूध, अंडी, मांस, भाज्यांसारख्या जीवनावश्यक अन्नपदार्थांसाठी केवळ घरपोच सेवेला परवानगी दिली आहे.
याव्यतिरिक्त केवळ अत्यावश्यक सेवांनाच परवानगी असणार आहे. लसीकरणासाठी दिलेल्या परवानगीचा कोणी गैरफायदा घेऊ नये यासाठी काही ठिकाणी नागरिकांना लसीकरणाच्या नोंदणीचा पुरवा सादर करणं बंधनकारक केलं आहे.