इंडिया दर्पण ऑनलाई डेस्क – जगभरातल्या अनेक देशांमध्ये मुलीची लग्नाआधी कौमार्य चाचणी म्हणजेच व्हर्जिनिटी टेस्ट केली जाते. कायद्याने बंदी असली तरी महाराष्ट्रातही कौमार्य चाचणी केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही समुदायांमध्ये लग्नाआधी वधूची कौमार्य चाचणी करण्याची प्रथा आहे फक्त मोजक्याच काही भागांमध्ये किंवा समुदायामध्ये कौमार्य चाचणीची प्रथा आढळते; पण ही प्रथा अद्यापही पूर्णपणे संपुष्टात आलेली नाही. त्यामुळे मुली कौमार्य चाचणीत पास होण्यासाठी अनेक प्रकारचे उपचार घेत असल्याचे प्रकारही समोर आले आहेत.
असे सांगण्यात येते की इराणमध्ये आजही कौमार्य चाचणीच्या आधारे हुंड्याची रक्कम ठरवली जाते. इराणमध्ये राहणाऱ्या हजारो महिला आणि मुलींची लग्नापूर्वी कौमार्य चाचणी केली जाते. ही चाचणी कोणत्याही वैद्यकीय आधाराशिवाय केली जाते. या चाचणीत अपयशी ठरलेल्या महिलांना हायमेन दुरुस्तीची शस्त्रक्रिया करण्यास भाग पाडले जाते. कौमार्य चाचणीत नापास झालेल्या महिलांची हत्या झाल्याचेही अनेक प्रकरणेसमोर उघड झाली आहेत.
वास्तविक कौमार्य चाचणीसाठी कोणताही वैद्यकीय आधार नसूनही इराणमध्ये अनेक नागरिक या चाचणीसाठी मुलींवर दबाव आणतात. या चाचणीबद्दल बोलताना हे कॅरेक्टर सर्टिफिकेट अजिबात आवडत नसल्याचं इराणच्या महिलांचं म्हणणं आहे. कारण त्यासाठी त्यांना एका विचित्र चाचणीतून जावं लागतं. कौमार्य चाचणीसाठी क्लिनिकमध्ये गेलेल्या एका महिलेनं सांगितले की, तिला इथे यायला अजिबात आवडत नाही; पण कौटुंबिक दबावामुळे तिला हे करावे लागते.
खरे म्हणजे व्हर्जिनिटीचा पुरावा देणे म्हणजे माझ्या चारित्र्याचा अपमान आहे. हे एक प्रकारे माझ्या प्रायव्हसीवर आक्रमण आणि लैंगिक छळ आहे, असं इराणमध्ये राहणाऱ्या आणखी एका महिलेने सांगितले. तसेच कौमार्य चाचणीबाबत बोलताना इराणमधील एका डॉक्टरने सांगितलं की, या चाचणीसाठी वरपक्षाकडून दबाव आणला जातो असे नाही, तर बऱ्याच वेळा मुलीचे कुटुंब या चाचणीसाठी मुलीवर दबाव आणतात. माझ्या निरीक्षणानुसार 90 टक्के प्रकरणांमध्ये मुलीच्या कुटुंबीयांनाच आपल्या मुलीची ही चाचणी करून घ्यायची असते.
त्याचबरोबर अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत, ज्यामध्ये मुलीशी लग्न करणाऱ्या मुलाचा मुलीवर पूर्ण विश्वास असतो आणि तो कौमार्य चाचणीला नकार देतो. मात्र तरीही मुलीचेच कुटुंबीय मुलीवर कौमार्य चाचणीसाठी दबाव टाकतात. इराणमध्ये पुरूष त्यांच्या मुली आणि पत्नींना मेडिकल सेंटरमध्ये घेऊन जातात आणि त्यांची चाचणी करवून घेतात. इराणच्या काही भागात कौमार्यासंबंधी या कुप्रथा अजूनही पाळल्या जातात. या प्रथांनुसार लग्नाच्या पहिल्या रात्री मुलीच्या पलंगावर पांढरी चादर किंवा रूमाल ठेवला जातो आणि दुसऱ्या दिवशी त्यावर रक्ताच्या खुणा आहेत की नाही ते पाहिले जाते.
याशिवाय कौमार्य चाचणीत फेल होणाऱ्या महिलांवर हायमेन रिपेअर सर्जरी करण्यासाठी दबाव टाकला जातो. यासाठी इराणमध्ये खूप पैसाही खर्च केला जातो. इराणमधील स्त्रीरोगतज्ज्ञ फरिमा फराहानी म्हणतात की दुर्दैवाने, ही हायमेन दुरुस्ती शस्त्रक्रिया इराणमध्ये पैसे कमवण्याचा सर्वांत मोठा मार्ग बनलाय. हायमेन रिपेअर करताना स्त्रियांच्या प्रायव्हेट पार्टचा भाग शिवला जातो. जेव्हा इंटरकोर्स होतो तेव्हा हा शिवलेला भाग उघडला जातो आणि त्यामुळे रक्तस्त्राव होतो. त्यावरून संबंधित तरुणी व्हर्जिन होती, असे समजले जाते, इराणमध्ये ही प्रथा सर्रास मानली जात असली तरी मेडिकल सायन्समध्ये या सर्जरीला कोणतीही मान्यता नाही.
In this Country Virginity test is compulsory for Girls