विशेष प्रतिनिधी, नागपूर
जगाच्या जवळपास प्रत्येक कोपऱ्यात भारतीय आहेत. काही देशांमध्ये तर चक्क भारतीयांचीच लोकसंख्या जास्त आहे. अश्या देशांना आपण मिनी भारत म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. दक्षिण प्रशांत महासागराच्या मेलोनेशियामध्ये असेच एक बेट आहे. जिथे ३७ टक्के भारतीय आहेत आणि शेकडो वर्षांपासून हे चालत आले आहे. त्यामुळेच येथील राजभाषांमध्ये हिंदीचा समावेश आहे आणि ती अवधी भाषेच्या रुपात विकसित झाली आहे.
या देशाचे नाव आहे फिजी. याठिकाणी मुबलक स्वरुपात वन, खनिजे आणि जलस्रोत उपलब्ध आहे. त्यामुळे फिजीला प्रशांत महासागरामधील बेटांमध्ये सर्वांत प्रगत राष्ट्र मानले जाते. इथे विदेशी चलनाचा सर्वांत मोठा स्रोत म्हणून पर्यटन आणि चीनची निर्यात आहे. फिजी बेटांचा समूह आपल्या सौंदर्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळेच जगभरातील पर्यटक इथे मोठ्या प्रमाणात फिरायला येतात.
ब्रिटनने १८७४ मध्ये हे बेट आपल्या नियंत्रणात घेतले होते. त्यानंतर इंग्रजांनी हजारो भारतीयांना इथे पाच वर्षाच्या करारावर ऊसाच्या शेतात काम करण्यासाठी आणले. या लोकांपुढे काही अटी ठेवण्यात आल्या होत्या. पाच वर्षांनी काम संपल्यावर भारतात परत जायचे असेल तर स्वतःच्या पैश्यांनी जावे लागेल. मात्र आणखी पाच वर्षे काम केले तर ब्रिटीश जहाज त्यांनी भारतात सोडून देईल, अशी इंग्रजांनी ठेवली होती.
बहुतांश मजुरांनी तिथेच काम करणे पसंत केले. मात्र नंतर ते कधीच भारतात परतले नाही, त्यामुळे ते फिजीचेच नागरिक होऊन बसले. अर्थात १९२० आणि १९३० च्या दशकात हजारो भारतीय इथे स्वेच्छेये स्थायिक झाले. फिजी बेटांच्या समूहात ३२२ बेट आहेत. ज्यातील १०६ स्थायी आहेत.
येथील विती लेवू आणि वनुवा लेवू हे दोन मुख्य बेट आहेत. या दोन बेटांवर फिजी देशाची ८७ टक्के लोकसंख्या राहते. फिजीतील बहुतांश बेटांची निर्मिती १५ कोटी वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या स्फोटांमुळे झालेली आहे. याठिकाणी आजही अशी अनेक बेट आहेत जिथे सातत्याने ज्वालामुखीचा स्फोट होत असतो.
मोठ्या संख्येने भारतीय असल्यामुळे इथे हिंदू मंदिरांची संख्याही खूप जास्त आहे. सर्वांत मोठे मंदिर नादी शहरात असून श्री शिव सुब्रमन्या हिंदू मंदिर असे त्याचे नाव आहे. फिजीमध्ये राहणारे हिंदू भारताप्रमाणे रामनवमी, होळी, दिवाळीसारखे सण साजरे करतात.