मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
स्त्रियांना देवीचे रूप मानले जाते आणि नारी शक्तीचा आपल्या देशात बहुमान करण्यात येतो, परंतु काही समाजामध्ये अद्यापही महिलांना योग्य सन्मान मिळत नाही, स्त्रियांना किंवा महिलांना सन्मान मिळावा म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात येतो. भारतात हजारो नव्हे तर लाखो मंदिरे आहेत, यातील अनेक मंदिरे त्यांच्या काही वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहेत. भाविक- भक्त त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी या मंदिरांना भेट देतात. यासोबतच अनेक प्रसिद्ध मंदिरांशी अनेक धार्मिक श्रद्धाही जोडलेल्या आहेत. दि. ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन दोन दिवसांनी येत आहे. आपल्या देशातील अशी अनेक मंदिरे किंवा धार्मिक स्थळे सादर करत आहोत, जिथे महिलांना जाण्यास मनाई आहे, परंतु आपल्या देशात अशी देखील काही मंदिरे आहेत जिथे फक्त महिलांना प्रवेश दिला जातो. याउलट पुरुषांना मनाई आहे. त्याच वेळी, या मंदिरांमध्ये पुरुष विशिष्ट वेळी पूजा करू शकत नाहीत. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अशाच काही मंदिरांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
ब्रह्मा मंदिर, राजस्थान
ब्रह्मा मंदिर पुष्कर, राजस्थान येथे आहे. ब्रह्मदेवाचे हे मंदिर संपूर्ण देशात फक्त पुष्करमध्ये आहे. हे मंदिर 14 व्या शतकात बांधले गेले होते, जिथे विवाहित पुरुषांना पूर्णपणे मनाई आहे. देवी सरस्वतीच्या शापामुळे येथे कोणताही विवाहित पुरुष जाऊ शकत नाही, अशी धार्मिक मान्यता आहे. या मंदिरात पुरुष परिसर किंवा मंदिराचे अंगण येईपर्यंत जातात आणि विवाहित स्त्रिया आत पूजा करतात.
भगवती देवी मंदिर, कन्याकुमारी
कन्याकुमारी येथील भगवती देवी मंदिरात देवी भगवतीची पूजा केली जाते. याविषयी एक धार्मिक कथा आहे की एकदा माता भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करण्यासाठी येथे आली होती. भगवती मातेला संन्यास देवी असेही म्हणतात, त्यामुळे संन्यासी पुरुषांना या दरवाजापर्यंतच मातेचे दर्शन घेता येते.
कामाख्या मंदिर, गुवाहाटी
आसाममधील गुवाहाटी येथे कामाख्या मंदिर निलांचल पर्वतावर आहे. मातेच्या सर्व शक्तिपीठांमध्ये कामाख्या शक्तीपीठाला सर्वात महत्त्वाचे स्थान आहे. देवीआईच्या मासिक पाळीच्या काळात येथे धार्मिक उत्सव साजरा केला जातो. या दिवसात मंदिरात पुरुषांच्या प्रवेशास सक्त मनाई आहे. मंदिराची पुजारी देखील एक महिला आहे.
चक्कुलाथुकावू मंदिर, केरळ
केरळमधील चक्कुलथुकावू मंदिरात दुर्गा मातेची पूजा केली जाते. या मंदिरात दरवर्षी पोंगलच्या दिवशी महिलांची पूजा केली जाते. ही पूजा १० दिवस चालते. तसेच चक्कुलथुकावू मंदिरात पुरुषांच्या प्रवेशास सक्त मनाई आहे. कन्या पूजेच्या शेवटच्या दिवशी अनेक पुरुष हे महिलांचे पाय धुतात.
संतोषी माता मंदिर, जोधपूर
जोधपूरच्या संतोषी माता मंदिरात शुक्रवारी पुरुषांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. पुरूष दिवसभर मंदिरात जात असतील तर मंदिराच्या दारात उभे राहूनच त्यांना देवीआईचे दर्शन होते, पण पूजा करता येत नाही. शुक्रवार हा माँ संतोषी दिन आहे आणि महिला या विशेष दिवशी उपवास करतात.