इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) भारतीय तटरक्षक दलाच्या सहकार्याने केलेल्या संयुक्त कारवाईत ७ मार्च रोजी मालदीवकडे जाणाऱ्या एका टग-बार्ज जहाजातून ३३ कोटी रुपये किमतीचे २९.९५४ किलो चरस तेल जप्त केले.
डीआरआय अधिकाऱ्यांना तुतीकोरिनच्या जुन्या बंदरातून निघालेल्या दगडांनी भरलेल्या बार्जला ओढणाऱ्या एका टग जहाजाबद्दल विशिष्ट गोपनीय माहिती मिळाली होती. तुतीकोरिनमधील तस्करांच्या टोळीने जहाजावरच्या कर्मचाऱ्याच्या मदतीने मालदीवला जाणाऱ्या एका जहाजात प्रवासादरम्यान भर समुद्रात मोठ्या प्रमाणात हशिश ऑईल चढवल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती.
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या सूचनेनुसार, भारतीय तटरक्षक दलाने ५ मार्च रोजी कन्याकुमारी किनाऱ्याजवळ समुद्रात हे जहाज अडवले आणि ७ मार्च रोजी ते नव्या तुतीकोरिन बंदरात परत आणले. दरम्यान, जहाजावर अंमली पदार्थ ठेवणाऱ्या व्यक्तीला आणि त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली. याव्यतिरिक्त, जहाज बंदरात आल्यानंतर जहाजाचे स्थान टोळीला सांगणाऱ्या जहाज कर्मचाऱ्यांला देखील पुढील चौकशीसाठी अटक करण्यात आली.
बार्जची तपासणी करताना अन्नपदार्थांचे वर्णन लिहिलेल्या २९ प्लास्टिक पॅकेट्स असलेल्या दोन पिशव्या जप्त करण्यात आल्या. या पॅकेट्सची तपासणी करण्यात आली आणि त्यात ‘काळ्या रंगाचा पेस्टसारखा पदार्थ’ आढळला. फील्ड टेस्ट किट वापरून या पदार्थाची चाचणी केली असता ते ‘हशीश ऑइल’ असल्याचे आढळले.
या कारवाईत एनडीपीएस कायदा १९८५ च्या तरतुदींनुसार एकूण २९.९५४ किलो वजनाची २९ पाकिटे जप्त करण्यात आली. आंतरराष्ट्रीय काळ्या बाजारात यांची अंदाजे किंमत ३२.९४ कोटी रुपये इतकी आहे. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना ८ मार्च रोजी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.