कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोल्हापुरातील नवीन राजवाडा येथे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेऊन संवाद साधला. यावेळी माजी आमदार मालोजीराजे, वसंतराव मुळीक, इंद्रजीत सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिल्यानंतर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज व उपमुख्यमंत्री पवार यांच्या या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.
या दौऱ्यात सकाळीच अजित पवार यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज ही भेट घेतली. मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. रायगडावरील शिवराज्यभिषेक सोहळा संपन्न झाल्यानंतर त्यांनी १६ जूनपासून कोल्हापुरातील राजर्षि शाहू महाराजांच्या समाधीपासून मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात करणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे कोल्हापूर येथील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आजच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.