विशेष प्रतिनिधी, मुंबई
कोरोना विरोधातील लढाईत समाजातील प्रत्येकजण आपापल्या परीने योगदान देतो आहे. मग, बॉलीवूड सेलिब्रिटी यात कसे मागे राहतील? अभिनेत्री हुमा कुरेशी हिने देखील या लढाईत उडी घेत दिल्लीत १०० बेडचे तात्पुरते कोविड रुग्णालय बांधण्याचे ठरवले आहे. या कामाासाठी हुमा ‘सेव्ह द चिल्ड्रन’ या एनजीओची मदत घेणार आहे. तसेच यासाठी फंड उभारण्यासाठी तिने मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला ‘ब्रीद ऑफ लाइफ’ असे नाव देण्यात आले आहे.
ट्विटरवर हुमाने याची माहिती दिली असून या उपक्रमात सहभागी होण्याची विनंती लोकांना केली आहे. या रुग्णालयात १०० बेड्ससोबत एक ऑक्सिजन प्लांट देखील असणार आहे. हुमाच्या या पोस्टवर अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. चित्रपटनिर्माते सुधीर मिश्रा यांनी देखील मदतीचे आश्वासन दिले आहे.
तर ‘आर्मी ऑफ द डेड’चे दिग्दर्शक जॅक स्नायडर यांनी हुमाची पोस्ट शेअर करत या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. जॅकने आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटीजना देखील यासाठी मदत करण्यास सांगितले आहे.