विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना प्रतिबंधक लशीमुळे जगातील नऊ लोक अब्जाधीश झाल्याची माहिती द पीपल्स व्हॅक्सिन अलायन्सने दिली आहे. या लोकांच्या संपत्तीमध्ये १९.३ अब्ज डॉलर (१४ खर्व रुपये) ची वाढ झाली आहे. ही संपत्ती अनेक गरीब देशांच्या लशीच्या गरजेच्या १.३ पटीहून अधिक पुरविण्यासाठी पुरेशी आहे.
द पीपल्स व्हॅक्सिन अलायन्स हा विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांचा गट आहे. हा गट लशींची मक्तेदारी अधिकार संपविण्याची मागणी करत आहे. ऑक्सफॅम नावाची संघटनासुद्धा या गटामध्ये सहभागी आहे.
ऑक्सफॅमची सदस्या अॅना मॅरियट सांगतात, औषध कंपन्या लस बनविण्याच्या एकाधिकारातून खूप पैसा कमवत आहेत. हे अब्जाधीश लोक याच कमाईचा मानवी चेहरा आहेत. या अब्जाधीशांशिवाय सध्याच्या आठ अब्जाधीशांच्या संपत्तीत एकूण ३२.२ अब्ज डॉलर म्हणजेच २५ अब्ज रुपयांची वाढ झाली आहे.
अब्जाधीशांच्या यादीत अग्रस्थानी मॉडर्नाचे स्टिफन बँसल आणि बायोएनटेकचे उगुर साहिन यांचा समावेश आहे. तीन इतर नव्या खर्वपती चीनची लस कंपनी कॅनसिनो बायोलॉजिक्सचे संस्थापक आहेत. नव्या नऊ अब्जाधीशांचे आकडे फोर्ब्सच्या सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीतील माहितीच्या आधारावर आहे.
नव्या अब्जाधीशांची यादी
नव्या अब्जाधीशांच्या यादीत मॉडर्नाचे सीईओ स्टिफेन बँसल (४.३ अब्ज डॉलर), बायोएनटेकचे सीईओ उगुर साहिन (चार अब्ज डॉलर), मॉडर्नाचे संस्थापक गुंतवणूकदार टिमोथी स्प्रिंगर (२.२ अब्ज डॉलर), मॉडर्नाचे चेअरमन नौबार अफेयान (१.९ डॉलर), आरओव्हीआयचे अध्यक्ष जुआन लोपेज बेलमॉन्टे (१.८ अब्ज डॉलर).
मॉडर्नाचे संस्थापक गुंतवणूकदार रॉबर्ट लँगर (१.६ अब्ज डॉलर), कॅनसिनो बायोलॉजिक्सचे सहसंस्थापक झू ताओ (१.३ अब्ज डॉलर), कॅनसिनो बायोलॉजिक्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष किऊ डोंगक्सू (१.२ अब्ज डॉलर) आणि कॅनसिनो बायोलॉजिक्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि सहसंस्थापक माओ हुइन्होआ (१ अब्ज डॉलर) यांचा समावेश आहे.
पूनावालासुद्धा अब्जाधीश
भारतातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक सायरस पूनावाला यांची संपत्ती गेल्या वर्षी ८.२ अब्ज ़डॉलरवरून वाढून २०२१ मध्ये १२.७ अब्ज डॉलर इतकी झाली आहे. कॅडिला हेल्थकेअरचे चेअरमन पंकज पटेल यांची संपत्ती गेल्या वर्षी २.९ अब्ज डॉलर होती. आता ती वाढून या वर्षी ५ अब्ज डॉलर इतकी झाली आहे.