नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ (बीसीसीआय) हे विश्वातील सर्वात श्रीमंत मंडळ असल्यामुळे त्यांचे जागतिक क्रिकेटवर नियंत्रण आहे. कारण पैसा बोलता है ! असे वादग्रस्त विधान पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान याने केले आहे.
इम्रान खान म्हणाला की, बीसीसीआय दि. 17 ऑक्टोबरपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये टी -20 विश्वचषक आयोजित करणार असून पाकिस्तानला भारताच्या गटात स्थान देण्यात आले आहे. इंग्लंडने यापूर्वी पाकिस्तानचा दौरा रद्द केला होता, पण भारताविरुद्ध असे करण्याचे धाडस इंग्लंडमध्ये नाही. कारण पैसा बोलतो. आगामी टी -20 विश्वचषकात भारताला आपला पहिला सामना दि. 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे.
इम्रान म्हणाला की, सध्या पैसा सर्वात महत्वाचा आहे. बीसीसीआय हे सर्वात श्रीमंत मंडळ आहे. सध्या इंग्लंडने पाकिस्तानबाबत जो निर्णय घेतला त्याविरोधात कारवाई करण्याचे धाडस कोणताही देश करणार नाही. कारण पैसा बोलतो म्हणूनच भारत जागतिक क्रिकेटवर नियंत्रण ठेवतो. केवळ खेळाडूच नाही, विविध देशांच्या मंडळांनाही भारताकडून पैसे मिळतात, म्हणूनच त्यांचे क्रिकेटवर पूर्णपणे वर्चस्व आहे.
इंग्लंड आणि न्यूझीलंड संघांचा पाकिस्तान दौरा रद्द केल्याबद्दल इम्रानने निराशा व्यक्त केली. तो म्हणाले की, पाकिस्तान आणि इंग्लंडमधील क्रिकेट संबंध यापुर्वी पाहिले आहेत, परंतु येथे इंग्लंडने आम्हाला निराश केले आहे. कारण टी -20 विश्वचषकापूर्वी इंग्लंडचा पुरुष आणि महिला संघ मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी पाकिस्तानचा दौरा करणार होता, परंतु इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) सुरक्षेच्या कारणास्तव हा दौरा रद्द केला. तसेच न्यूझीलंडनेही शेवटच्या क्षणी पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला. त्यामुळे इम्रानचा तिळपापड झाला आहे.