विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
जगातल्या वेगवान गोलंदाजांमध्ये गणना होणाऱ्या इम्रान खानने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यापासून त्याचा प्रत्येक ‘बॉल’ व्यर्थ जात आहे. विशेषतः पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्विकारल्यापासून त्याचे नो-बॉल्स वाढले आहेत. दररोज कुठल्या ना कुठल्या वादग्रस्त किंवा विनोदी विधानांमुळे जगभरात चर्चेत राहणाऱ्या इम्रानने आता भारत-पाक संबंधांविषयी वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की, नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान नसते तर भारत-पाक यांच्यातील सर्व प्रश्न सहज सुटले असते. या विधानानावरुन नेटकरी इम्रानची यथेच्छ धुलाई करीत आहेत.
फाळणीपासून आजपर्यंत पाकिस्तानने भारताकडे द्वेषाच्याच नजरेतून बघितले आहे. पण भारताने मात्र कायम संयमाची आणि मित्रत्वाची भावना ठेवली. इम्रान खान पंतप्रधान असतानाच २०१९ मध्ये पाकिस्तानने पोसलेल्या दहशतवाद्यांनी पुलवामामध्ये अटॅक केला आणि आता त्याच इम्रान खानने न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोदींमुळे संबंध बिघडल्याचे सांगितले आहे.
इम्रान म्हणतो, ‘मी सत्तेत आल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संपर्क केला. पाकिस्तानातील गरिबी दूर करण्यासाठी दोन्ही देशांमधील संबंध चांगले राहणे आवश्यक आहे, असे मी त्यांना सांगितले. परंतु, आरएसएस विचारधारा मध्ये आली. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध चांगले होऊ शकले नाहीत. मोदींच्या ऐवजी दुसरा कुणी सत्तेत असता तर चर्चा करून सर्व प्रश्न सोडवले असते.’ पण काश्मीर प्रश्न सुटला तर पाकिस्तानला परमाणू शस्त्रांची आवश्यकताच पडणार नाही, असे विधान करून इम्रानने त्याचा इरादा स्पष्ट केला.
अमेरिकेशी जुळायचे आहे
अमेरिकेसोबत संबंध खराब करून पाकिस्तानला मोठे नुकसान भोगावे लागले आहे. पण आता अमेरिकेसोबत नव्याने संबंध जुळवून घ्यायचे आहेत, असे इम्रान म्हणतो. अमेरिका आणि ब्रिटन यांच्यात जसे नाते आहे, तसेच अमेरिका-पाकिस्तानचे असावे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही तो सांगतो.
सोशल पडसाद
इम्नानच्या वक्तव्याचे सोशल मिडीयात तीव्र पडसाद उमटत आहेत. नेटकरी सध्या इम्रान खान आणि पाकिस्तानची यथेच्छ धुलाई करीत आहेत. आजवर हा प्रश्न का सुटला नाही, पाकिस्तान दहशतवाद्यांना मदत करणे कधी बंद करणार, पाकिस्तानची वृत्ती कधी सुधारणार यासह अनेक प्रश्नांचा भडिमारही यानिमित्ताने केला जात आहे. काही जणांनी तर हे वक्तव्य हास्यास्पद असून इम्रान यांची कीव येत असल्याचेही म्हटले आहे.