मुंबई – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सतत वेगवेगळे संशोधन मांडून त्यातून एक अफलातून असा निष्कर्ष मांडण्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. अनेक देश तर त्यांच्या विधानाला जागतिक स्तरावरील मनोरंजनाचे साधन समजतात. आता तर एक नवे संशोधन इम्रान यांनी मांडले आहे. ते म्हणतात की मोबाईलच्या अतिवापरामुळे पाकिस्तानात बलात्कार वाढत आहेत.
मोबाईलचा दुरुपयोग आणि अतिवापर लैंगिक गुन्ह्यांचे मुख्य कारण आहे असे सांगून महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात हात वर करण्याचा एक नवा फंडा इम्रान यांनी काढलेला आहे. लाहोरच्या ग्रेट इक्बाल पार्कमध्ये एक महिला टिकटॉकर आणि तिच्या सहकाऱ्यांना गर्दीने त्रास देणे आणि त्यांच्यावर हल्ला चढविल्याची घटना घडली होती. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास अशा घटना घडणार नाही, असे वक्तव्य केले आहे. यापूर्वी महिलांचे छोटे कपने पुरुषांना उत्साहित करतात, असे विधान इम्रान यांनी केले होते. या विधानावरून त्यांच्यावर जोरदार टिका झाली होती.
नेमकी घटना काय?
लाहोर येथे मिनार-ए-पाकिस्तानजवळ एक महिला टिकटॉकर आणि तिचे काही सहकारी एक व्हिडीयो शूट करीत होते. त्याचवेळी जवळपाच ४०० लोकांच्या गर्दीने त्यांच्यावर हल्ला केला. गर्दीतील काही पुरुषांनी या महिलेला उचलले. हवेत फेकून झेलायला लागले. त्यानंतर तिचे कपडे काढून फाडून टाकले, अशी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. इम्रान यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असून त्यामुळे आपण अस्वस्थ झाल्याचे सांगितले. अशाप्रकारच्या घटना आपली संस्कृती आणि धर्माची नाचक्की करणाऱ्या आहेत. भूतकाळात महिलांना आपल्या देशात जो सन्मान मिळायचा तो जगात कुठेही मिळायचा नाही, असेही इम्रान म्हणाले.